कानेगाव गटातून आनंद पाटील यांनाच उमेदवारीची मागणी . .
शिवसेनेसमोर जनतेची तीव्र मागणी ; राजकीय वर्तुळात खळबळ..!!
धाराशिव | दि. १९ | प्रतिनिधी
आगामी जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कानेगाव (ता. लोहारा) गटातील राजकीय वातावरण अचानक तापले असून, शिवसेनेचे युवा नेतृत्व आणि धाराशिव युवासेना लोकसभा अध्यक्ष आनंद पाटील यांनाच उमेदवारी द्यावी, अशी तीव्र मागणी आता उघडपणे जनतेतून पुढे येत आहे. या मागणीमुळे जिल्हाभरात राजकीय चर्चांना वेग आला असून, अनेक समीकरणे हलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
गेल्या काही काळात युवासेनेचे संघटन मजबूत करत जिल्ह्यात सक्रिय असलेले आनंद पाटील हे नाव केवळ पक्षापुरते मर्यादित न राहता सर्वसामान्य नागरिकांमध्ये पोहोचल्याचे चित्र आहे. युवक, शेतकरी, कामगार आणि गोरगरिबांच्या प्रश्नांवर सातत्याने उपस्थित राहणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली असून, “लोकांमधला लोकप्रतिनिधी” अशी भावना कानेगाव गटात रुजत असल्याची चर्चा आहे.
पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या संपर्कातून विविध विकासकामांसाठी पाठपुरावा केल्यामुळे स्थानिक पातळीवर कामांना गती मिळाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे विकासाशी थेट जोडलेले, प्रशासनाशी समन्वय साधणारे आणि लोकांच्या प्रश्नांसाठी धावून जाणारे नेतृत्व म्हणून आनंद पाटील यांच्याकडे पाहिले जात आहे.
कानेगाव गटात सध्या एकच चर्चा ऐकायला मिळत आहे “यावेळी नाव नव्हे, काम बोलले पाहिजे”. जनसंपर्क मजबूत असलेले, अडीअडचणीत उभे राहणारे आणि सातत्याने लोकांशी संवाद साधणारे नेतृत्व म्हणून आनंद पाटील यांनाच संधी मिळावी, अशी मागणी मतदारांमधून उघडपणे व्यक्त होत आहे. या मागणीमुळे इतर संभाव्य दावेदारांमध्ये अस्वस्थता वाढल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
दरम्यान, उमेदवारीचा अंतिम निर्णय शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवर होणार असला, तरी कानेगाव गटातून उठलेली ही जनतेची तीव्र मागणी दुर्लक्षित करणे पक्षासाठी सोपे ठरणार नसल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे. या मागणीमुळे जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वीच कानेगाव गटात राजकीय भूकंपासारखी परिस्थिती निर्माण झाली असून, शिवसेनेचा पुढील निर्णय संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेणारा ठरणार आहे.


















Total views : 4448