धाराशिव राजकारणात खळबळ — भाजपचे डॅमेज कंट्रोल सुरू!
भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य, नितीन काळे यांची आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासोबत विशेष बैठक
धाराशिव :
धाराशिव जिल्ह्यातील राजकीय तापमान पुन्हा एकदा चांगलेच वाढले आहे. भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यात गेल्या काही दिवसांत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर आज एक अत्यंत महत्वाची राजकीय भेट पार पडली.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी जिल्हाध्यक्ष संताजी चालुक्य (मामा), तसेच पक्षाचे ज्येष्ठ नेते नितीन काळे यांनी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री आणि भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांची आज खास भेट घेतली.
नगरपरिषद आणि जिल्हा परिषद निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या असताना झालेली ही भेट राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाची मानली जात आहे.
धाराशिव नगरपालिकेच्या १४० कोटींच्या विकासकामांच्या कार्यारंभ आदेशावर स्थगिती मिळाल्यानंतर महायुतीत तणाव निर्माण झाला होता. शिवसेनेने भाजपावर थेट निशाणा साधला, तर भाजप प्रवक्त्यांनीही प्रत्युत्तरात शिंदे गटावर जोरदार टीका केली होती.
मात्र, ज्यांच्या कार्यकाळात हा निधी प्राप्त झाला त्या तानाजी सावंत यांच्याशी भाजपच्या जिल्हा पातळीवरील या उच्चस्तरीय नेत्यांची भेट झाल्याने, भाजपकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या भेटीनंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू —
“महायुतीत पुन्हा सलोखा साधला जाणार का?”
“भाजप आणि शिंदे गटात समन्वय साधण्यासाठी ही बैठक होती का?”
सद्यस्थितीत दोन्ही पक्षांत सुरू असलेल्या संवादाच्या हालचालींमुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकारणात नव्या समीकरणांची चिन्हे दिसू लागली आहेत.




















Total views : 4448