२४ तासांत गुन्ह्याचा छडा; ट्रकमधून चोरलेल्या मेंढ्या जप्त, ३.१९ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
येरमाळा, प्रतिनिधी : येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत महामार्गावरून जाणाऱ्या ट्रकमधून चोरट्यांनी मेंढ्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत गुन्ह्याचा छडा लावत तब्बल ३ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या धडाकेबाज कारवाईमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेचे पुन्हा एकदा दर्शन घडले आहे.
२३ मे २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास महामार्गावरून जाणाऱ्या ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी मेंढ्या चोरून नेल्या होत्या. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. स्थानिक गुन्हे शाखा, आरसीपी पथक क्रमांक १ आणि क्यूआरटी पथकाने संयुक्तरीत्या तपास सुरू केला.
गोपनीय माहितीच्या आधारे तेरखेडा परिसरातील लक्ष्मी पारधी पिढी व उमरा पारधी पिढी येथील काही इसमांनी चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. तसेच चोरीच्या मेंढ्या बाभळीच्या झाडाखाली उभ्या असलेल्या लाल रंगाच्या टमटम वाहनात असल्याचे समजताच पोलिसांनी तात्काळ सापळा रचला.
पोलीस पथक घटनास्थळी पोहोचताच तेथे उपस्थित काही संशयित इसमांनी पळ काढला. मात्र वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये चोरीस गेलेल्या मेंढ्या आढळून आल्या. फिर्यादीकडून खात्री करून घेतल्यानंतर मेंढ्या व टमटम वाहन असा एकूण ३ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या उल्लेखनीय कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, महिला पोलीस हवालदार शोभा बांगर, पोलीस नाईक संतोष तिवाडे, संदीप चोघुले, रोहित दंडनाईक तसेच आरसीपी व क्यूआरटी पथकातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
स्थानिक गुन्हे शाखेच्या या तत्पर कारवाईमुळे चोरीस गेलेला मुद्देमाल अल्पावधीत हस्तगत करण्यात यश आले असून, पोलीस दलाच्या दक्षतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.




















Total views : 12296