“तुळजापूरचा अपमान थांबवा! — भाजप शहराध्यक्ष आनंद कंदले यांचा सुप्रिया सुळे यांना खडसावणारा खुला पत्रप्रहार”
तुळजापूर, प्रतिनिधी :
तुळजापूर शहरातील ड्रग्ज प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री महोदयांना पत्र देत चिंता व्यक्त केली होती. मात्र या पत्रामागील माहिती अर्धवट असून, राजकीय हेतूने तुळजापूरची बदनामी केली जात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे शहराध्यक्ष आनंद कंदले यांनी केला आहे. त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांना उद्देशून एक सविस्तर खुलं पत्र लिहित “तुळजापूरची प्रतिमा मलिन करण्याच्या षडयंत्रात आपणही सहभागी झालात याचं वाईट वाटतं” अशी टीका केली आहे.
“अर्धवट माहितीवरून तळमळ व्यक्त, तरी धन्यवाद…”
कंदले यांनी पत्रात म्हटलं आहे की, “संतोष परमेश्वर राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन वेळा नगरसेवक आणि एक वेळा नगराध्यक्ष राहिले. त्यांनी पक्ष बदलून भाजपात प्रवेश केला, आणि त्यानंतरच आपण मुख्यमंत्री महोदयांना पत्र दिलं. अर्धवट माहितीच्या आधारे आपण व्यक्त केलेली तळमळ पाहून आश्चर्य वाटले.”
त्यांनी पुढे म्हटलं, “आपण संसदरत्न आहात, अभ्यासू आहात अशी आपली ख्याती आहे. तरीसुद्धा चुकीच्या माहितीवरून तातडीने भूमिका घेतलीत, हे तुळजापूरकरांसाठी निराशाजनक आहे.”
“ड्रग्ज प्रकरण उघडकीस आणण्यात भाजपाचा पुढाकार”
कंदले यांनी स्पष्ट केलं की, “पोलिसांनी ४१ ग्रॅम ड्रग्ज जप्त केले असून ही कारवाई आमच्या नेत्यांच्या पुढाकारामुळेच शक्य झाली. तुळजापूरमधील माता-भगिनींच्या विनंतीवरून आमच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला आणि संपूर्ण प्रकरण उघडकीस आणलं.”
ते म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना पत्र देताना भाजपाबद्दल काळजी व्यक्त करणं म्हणजे केवळ राजकीय नाट्य आहे. या प्रकरणातील आरोपींमध्ये सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आहेत, आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांचाही त्यात समावेश आहे हे आपण जाणून घेणं गरजेचं आहे.”
“तुळजापूरची बदनामी थांबवा”
कंदले यांनी पत्रात पुढे म्हटलं की, “उबाठा गटाचे खासदार ओम राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे नेहमीप्रमाणे तुळजापूरची बदनामी करत आहेत. त्यांच्या या चांडाळ चौकडीच्या षडयंत्रात आपण सहभागी झालात हे दुर्दैवी आहे.”
ते म्हणाले, “भाजप नेत्यांच्या पुढाकाराने पोलिसांनी कारवाई केली. पण महाविकास आघाडीतील नेत्यांनी कधी साधा पाकिटमार तरी पकडला का? तुळजापूरची काळजी असेल तर आपण स्वतः तुळजापूरला या, परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घ्या. आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहोत.”
“सुळे ताईंनी तुळजापूरकरांची मनःस्थिती समजून घ्यावी”
पत्राच्या शेवटी कंदले यांनी नमूद केले आहे की, “आपल्याला आमच्या नेत्याची ओळख लहानपणापासून आहे. ते अशा प्रकारांना पाठबळ देतील असा आपल्यालाच विश्वास आहे का? तुळजापूरसारख्या पवित्र तीर्थक्षेत्राची बदनामी थांबवावी, एवढीच आमची नम्र विनंती आहे.”
या खुल्या पत्रामुळे तुळजापूर राजकारणात नव्या वादळाची चाहूल लागली असून, भाजप आणि राष्ट्रवादीत पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपाचा सिलसिला सुरू होण्याची चिन्हं स्पष्ट झाली आहेत.
आचारसंहितेचे पालन राखत, हे पत्र केवळ तुळजापूरच्या प्रतिमेबाबतची भूमिका स्पष्ट करणारे असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले आहे.




















Total views : 4449