*महाविस्तार एआय अॅप वापर बाबत उमरगा तालुक्यात जनजागृती मोहीम
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाविस्तार ॲपचा वापर करण्याचे तालुका कृषी अधिकारी यांचे आवाहन.
“महाविस्तार एआय अॅप हे शेतकऱ्यांचा सच्चा डिजीटल मित्र असून, शेतकऱ्यांच्या शेतीतील दैनंदिन अडचणींवर त्वरित व अचूक सल्ला देणारे अत्याधुनिक साधन आहे,” असे प्रतिपादन तालुका कृषी अधिकारी श्री. डी. बी. रितापुरे यांनी पेठसांगवी येथे आयोजित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात केले.
कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांनी शेतकऱ्यांसाठी विकसित केलेले महाविस्तार ॲपबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री राजकुमार मोरे यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय कृषी अधिकारी श्री महादेव आसलकर यांनी महाविस्तार AI ॲपचा शेतकऱ्यांमध्ये वापर वाढवण्यासाठी गावोगाव जनजागृती मोहिमेचे नियोजन करण्यात आलेले आहे.
कृषी विभागाने केलेल्या नियोजनाप्रमाणे गावोगाव सहाय्यक कृषी अधिकारी,उपकृषी अधिकारी यांच्या सहभागातून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून महाविस्तार याबाबत माहिती देण्यात येत आहे. उमरगा तालुक्यामध्ये या जनजागृती मोहिमेचे नियोजन तालुका कृषी अधिकारी श्री रितापुरे यांनी केलेले आहे.
दि ५ डिसेंबर रोजी मौजे पेठसांगवी तालुका उमरगा येथे सरपंच, उपसरपंच यांच्या उपस्थितीत आयोजित जागतिक मृदा दिन कार्यक्रमानिमित्त तालुका कृषी अधिकारी श्री रितापुरे बोलत होते शेतकऱ्यांनी महाविस्तार ए आय या अॅपचा गावागावात प्रचार करून अधिकाधिक शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा लाभ मिळवून देण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमात शेतकऱ्यांना महाविस्तार एआय अॅप व त्यातील आधुनिक एआय चॅटबॉट सुविधा याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. तज्ज्ञ सल्ला, तांत्रिक माहिती आणि पिकांशी संबंधित समस्यांवरील निर्णयक्षम मार्गदर्शन एका क्लिकमध्ये मिळू शकते, या अॅपचा हा मुख्य उद्देश असल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले.
तालुका तंत्र व्यवस्थापक श्री. सय्यद यांनी सांगितले की, “महाविस्तार एआय अॅप हे महाराष्ट्र शासनाचे आधुनिक डिजिटल व्यासपीठ असून शेतकऱ्यांना पिकांशी संबंधित कोणताही प्रश्न विचारता येतो व त्यावर तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन तत्काळ मिळते.”
अॅपमधील एआय चॅटबॉट प्रणाली शेतकऱ्यांना –
- कीड-रोग व्यवस्थापन
- हवामानाचा अंदाज
- पिकांचे पोषण व्यवस्थापन
- शिफारस केलेली कृषी तंत्रज्ञान माहिती
- मराठीत प्रश्न व मराठीत उत्तरे
अशा सर्व सुविधा उपलब्ध करून देते, ही या अॅपची वैशिष्ट्यपूर्ण बाब असल्याचे त्यांनी सांगितले.
या वेळी सहाय्यक कृषी अधिकारी श्री अमोल बलसुरे व सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक श्री. पी. बी. गर्जे यांनी महाविस्तार एआय अॅप प्रत्यक्ष डाउनलोड करून दाखवले, तसेच महाविस्तार “अॅपमध्ये प्रश्न कसे विचारावेत व कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारल्यास अधिक अचूक सल्ला मिळतो” याविषयी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी प्रगतशील शेतकरी श्री. किशोर करके (एकुर्गा) यांनी आभार प्रदर्शन करून शेतकऱ्यांना या प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा प्रत्यक्ष शेतीमध्ये उपयोग करण्याचे आवाहन केले.
कृषी सखी रूपाली महाजन व प्रभावती महाजन यांनी शेतकऱ्यांना अॅप डाउनलोड करण्यासाठी विशेष प्रोत्साहन दिले.
कार्यक्रमास सरपंच शब्बीर मुजावर, सिराज शेख, तसेच गावातील प्रगतशील शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविस्तार एआय अॅपच्या माध्यमातून तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने पेठसांगवीतील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.






















Total views : 4449