विकासासाठी मनावर दगड ठेवून ओमराजेंचा मोठा निर्णय?; चर्चेने विरोधकांच्या गोटात अस्वस्थता
धाराशिव : त्रिशक्ती विशेष प्रतिनिधी:- जिल्ह्याच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या घडामोडींमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. खासदार ओमप्रकाश (ओमराजे) निंबाळकर धनुष्यबाण हाती घेण्याच्या निर्णयाच्या चर्चांनी विरोधकांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाली असून समर्थकांमध्ये मात्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
गेल्या काही वर्षांपासून विरोधी पक्षाचा खासदार म्हणून काम करत असताना विकासकामांच्या बाबतीत अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची भावना कार्यकर्ते व नागरिक व्यक्त करत आहेत. खासदार निधीतून विविध कामे पूर्ण झाली असली तरी अनेक मोठ्या विकास प्रकल्पांना अपेक्षित गती मिळत नसल्याची खंत मतदारसंघातील नागरिकांमध्ये वारंवार व्यक्त होत होती.
“जनतेने माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मतदारसंघातील प्रत्येक नागरिकाचे काम मार्गी लागावे, विकासाची गती वाढावी आणि रखडलेले प्रश्न सुटावेत यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार,” अशी भावना ओमराजे निंबाळकर यांच्या समर्थकांकडून व्यक्त होत आहे. जनतेची कामे थांबू नयेत, विकासात अडथळे येऊ नयेत आणि मतदारसंघाला अधिकाधिक निधी उपलब्ध व्हावा यासाठीच हा निर्णय घेतला जात असल्याची चर्चा सुरू आहे.
राजकारणात पक्षापेक्षा जनतेचा विकास महत्त्वाचा असतो. विरोधात राहून अनेकदा प्रशासकीय आणि राजकीय अडथळ्यांचा सामना करावा लागतो. मात्र सत्तेच्या माध्यमातून विकासकामांना गती मिळू शकते, असा विश्वास अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. त्यामुळे जनहितासाठी घेतले जाणारे निर्णय हे व्यापक विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे ठरतात, असे मत मतदारसंघातील विविध स्तरांतून व्यक्त होत आहे.
दरम्यान, ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य निर्णयाच्या चर्चेनंतर विरोधकांच्या गोटातही हालचालींना वेग आला आहे. मतदारसंघात मजबूत जनाधार असलेल्या नेतृत्वाने घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा राजकीय परिणाम दूरगामी असतो. त्यामुळे आगामी काळात धाराशिवच्या राजकारणात मोठे बदल घडू शकतात, अशी चर्चा रंगू लागली आहे.
जनतेच्या विकासासाठी, रखडलेल्या प्रश्नांच्या समाधानासाठी आणि मतदारसंघाला नवी दिशा देण्यासाठी कोणताही निर्णय घेतला गेला तर तो जनहिताचा असेल, अशी भावना समर्थकांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी राजकीय घडामोडींवर संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून ओमराजेंच्या पुढील भूमिकेबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |




















Total views : 14790