पार्किंगच्या नावाखाली यात्रेकरूंची लूट थांबणार का?
येरमाळा पोलीस ठाण्याच्या नव्या प्रभारी अधिकाऱ्यांसमोर अवैध धंदे, मटका-जुगार, चोरी आणि मारहाणीचे मोठे आव्हान
येरमाळा | प्रतिनिधी
येरमाळा पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेल्या प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षकांसमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच अनेक गंभीर प्रश्नांचा डोंगर उभा ठाकला आहे. परिसरात सुरू असलेले कथित अवैध धंदे, गुटखा विक्री, मटका-जुगार, वाढत्या चोरीच्या घटना तसेच यात्रेकरूंना पार्किंगच्या नावाखाली होणारी लूट आणि मारहाणीच्या तक्रारींमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
येरमाळा हे धार्मिक महत्त्वाचे ठिकाण असल्याने येथे वर्षभर हजारो भाविक आणि यात्रेकरू येत असतात. मात्र काही ठिकाणी पार्किंग शुल्काच्या नावाखाली अवाजवी वसुली होत असल्याच्या तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. काही भाविकांनी वसुलीबाबत प्रश्न उपस्थित केल्यास त्यांच्याशी वाद घालणे, दमदाटी करणे आणि मारहाणीचे प्रकार घडत असल्याची चर्चा परिसरात आहे.
दुसरीकडे, गुटखा विक्री, मटका-जुगार आणि इतर कथित अवैध धंद्यांविरोधात प्रभावी कारवाईची मागणीही जोर धरत आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी आणि नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नव्या प्रभारी अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन, यात्रेकरूंच्या सुरक्षेची हमी, पार्किंगच्या नावाखाली होणाऱ्या कथित वसुलीवर आळा आणि गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
येरमाळा परिसरात कायद्याचा धाक निर्माण करून सर्वसामान्य नागरिक व भाविकांना दिलासा देण्याची मोठी जबाबदारी आता नव्या पोलीस नेतृत्वावर आहे. त्यामुळे येत्या काळात पोलीस प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |


















Total views : 13321