खोट्या मारहाणीच्या प्रकरणावरून राजकारण तापले! प्रभाग २० मधील विलास लोंढे यांच्या वाढत्या लोकप्रियतेला काहींचा हेवा?
“लोकप्रियतेला हेवा की राजकीय डाव? – विलास लोंढे समर्थकांचा संताप”
धाराशिव (प्रतिनिधी):धाराशिव शहर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या मारहाणीच्या प्रकरणामुळे शहरातील स्थानिक राजकारणात चांगलाच गदारोळ उडाला आहे. पार्वतीबाई राम साळुंके (वय ६०, रा. शिवरत्न चौक, जुना बस डेपो मागे, धाराशिव) यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून विलास लोंढे, बिभीषण लोंढे आणि इतर १६ जणांविरोधात धाराशिव शहर पोलिस ठाण्यात भा.दं.वि. कलम 189(2), 191(2)(3), 190, 118(1), 119(1), 333, 334(1), 324(4), 352, 351(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साळुंके यांच्या तक्रारीनुसार दि. ०२ नोव्हेंबर २०२५ रोजी जुना बस डेपो परिसरात आरोपींनी एकत्र येऊन शिवीगाळ करत लाथाबुक्यांनी, लोखंडी दांडक्याने व रॉडने मारहाण करून जखमी केले. तसेच घरातील रोख रक्कम ४०,००० रुपये व मंगळसूत्र हिसकावून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मात्र या प्रकरणावरून धाराशिव शहर येथे राजकीय वातावरणात वेगळीच चर्चा रंगू लागली आहे. प्रभाग क्रमांक २० मधील सर्व समाजात लोकप्रिय असलेल्या विलास लोंढे यांच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे काही स्वपक्षातीलच स्वयंघोषित नेत्यांनी विरोधकांशी हातमिळवणी करून खोटे प्रकरण रचल्याचा आरोप त्यांच्या निकटवर्तीयांनी केला आहे.
त्यांच्या समर्थकांनी “विलास लोंढे हे सर्व समाजातील नागरिकांच्या सुख-दुःखात धावून जाणारे, समाजातील सर्व घटकांना मदत करणारे केवळ निवडणुकीत न उगवता बारा महिने चोवीस तास मदत करणारे सच्चे समाजसेवक आहेत. त्यांची लोकप्रियता पाहून काहींना जळफळाट झाला असून, राजकीय डावपेच म्हणून हे खोटे आरोप लावले गेले आहेत,” असे स्पष्ट केले.
प्रभागातील सामान्य नागरिकांनी देखील या घटनेवर तीव्र नाराजी व्यक्त करत “अशा खोट्या गुन्ह्यांमुळे खऱ्या समाजसेवकांचा उत्साह कमी होणार नाही, उलट विलास लोंढे यांना अधिक मतांनी विजय मिळेल,” असा विश्वास देखील व्यक्त केला जात आहे.
विलास लोंढे यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले की “विरोधकांचा आणि स्वपक्षातील काहींचा कुटील डाव हा जनता ओळखते. आपल्या राजकीय कारकिर्दीला यांच्यामुळे तडा जाऊ शकतो, त्यांची वाढत असलेली लोकप्रियता आपल्यासाठी अडचणीची ठरू शकते, भविष्यात आपल्याला याची किंमत मोजावी लागेल यासाठी असे डाव टाकले जात असताना लोंढे यांना कितीही खचवण्याचा प्रयत्न झाला तरी ते नव्या जोमाने समाजसेवेत उतरतील आणि नगरपालिकेत लोकप्रतिनिधी म्हणूनच पोहोचतील,” असा विश्वास देखील व्यक्त करण्यात आला.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |





















Total views : 4449