धनगर समाजाच्या पाठिंब्याने क्षीरसागरांच्या उमेदवारीला बळ : – अण्णासाहेब देशमुख
दैनिक त्रिशक्ती / राजेश शिंदे
मोहोळ : -मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शितल सुशील क्षीरसागर यांना धनगर समाजाचा ठाम पाठिंबा असल्याचे मत समाजाचे मार्गदर्शक अण्णासाहेब देशमुख यांनी व्यक्त केले. क्षीरसागर कुटुंबाने समाजाच्या रूढी-परंपरा जपल्या असून, समाजाच्या प्रश्नांवर नेहमीच पुढाकार घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.
शितल क्षीरसागर यांनी ‘देशमुख गडी’ येथे भेट देऊन आशीर्वाद घेतल्यावर बोलताना देशमुख म्हणाले की, माजी आमदार राजन पाटील भाजपात आल्यानंतर संपूर्ण संघटना क्षीरसागर कुटुंबाच्या पाठीशी उभी आहे. पक्षातील कुणीही नाराज नसून, मोहोळमध्ये भाजपा नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवक बहुमताने विजयी होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नगरपरिषदेत शिक्षण, आरोग्य, स्वच्छता आणि विकासकामांवर सक्षम नियंत्रण ठेवण्याची क्षमता शितल क्षीरसागर यांच्या व्यक्तिमत्त्वात असल्याचेही देशमुख यांनी नमूद केले.
चौकट : –
“उठसुठ राजन पाटलांवर टीका का?”
विरोधकांना टीका करण्यासारखे एकही मुद्दे नसल्याने ते वारंवार माजी आमदार राजन पाटलांवरच टीका करत आहेत. “ही नगरपरिषदेची निवडणूक आहे. टीका करायची असेल तर माझ्यावर, किंवा मोहोळमधील भाजप कार्यकर्त्यांवर करा. गावातील निवडणुकीत राजन पाटलांना अनाठायी लक्ष्य करणे योग्य नाही,” अशी टीका अण्णासाहेब देशमुख यांनी व्यक्त केली.






















Total views : 4449