मोहोळ स्मार्ट सिटीच्या दिशेने – विकासाचा आराखडा जाहीर .
दैनिक त्रिशक्ती / राजेश शिंदे
मोहोळ :मोहोळ नगरपरिषद निवडणुकीत विकासाचा व्हिजन ठेवून वाटचाल करणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात आले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील विकास मॉडेलप्रमाणे मोहोळ शहराचे नियोजन करणार असल्याची माहिती निवडणूक प्रभारी सुशील क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
रस्ते, पाणी, आरोग्य, क्रीडा सुविधांसह अनेक प्रकल्प
शहरातील मूलभूत सेवांमध्ये सुधारणा करण्यावर भर देण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.मोहोळ शहरासाठी शाश्वत व शुद्ध पाणीपुरवठा योजना ,सांडपाणी व स्वच्छतेसाठी आधुनिक नियोजन,५० खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारणीसाठी प्रयत्न,
युवकांसाठी रोजगार निर्मिती,क्रीडा संकुल, इनडोअर व आउटडोअर स्टेडियम ,“करा योग, रहा निरोग” संकल्पनेतून योगा सेंटर ,ओपन जिम व वॉकिंग ट्रॅक याचे नियोजन करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले .मागील नगरपरिषदेत भाजपचे अल्प प्रतिनिधित्व असल्यामुळे जाहीरनाम्याची अंमलबजावणी शक्य न झाल्याचे क्षीरसागर यांनी नमूद केले. पालकमंत्री यांसह जिल्ह्यातील नेतृत्वाच्या साथीनं यावेळी अपेक्षित ताकद मिळण्याचा त्यांचा दावा होता.
■ चौकट ■
शहराची स्वच्छता व महिला सक्षमीकरणासाठी कटिबद्ध — शीतल क्षीरसागर
मोहोळ शहरात आजही सार्वजनिक स्वच्छतागृहांची कमतरता असल्याने विशेषतः ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या महिलांची मोठी गैरसोय होत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी स्वच्छतेला प्राधान्य देत मोहोळ शहर स्वच्छ आणि सुव्यवस्थित करण्याचा आमचा प्रमुख अजेंडा आहे, असे लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या भाजपा उमेदवार शीतल सुशील क्षीरसागर यांनी सांगितले.
महिलांना केवळ चूल आणि मूल या चौकटीत न पाहता, त्यांना स्वावलंबी करण्याची गरज असल्याचे त्या म्हणाल्या. मोहोळ शहरातील अनेक महिलांच्या हाताला आजही रोजगार नाही. महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना स्वबळावर उभे करण्यासाठी मी ही निवडणूक लढवत आहे.मोहोळ शहराला शुद्ध पिण्याचे पाणी मिळणे ही देखील अत्यावश्यक गरज असून या प्रश्नावरही प्राधान्याने काम केले जाईल, असे क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
— शीतल सुशील क्षीरसागर .





















Total views : 4449