धाराशिव नगर परिषदेत भाजपचा दणदणीत विजय;
धाराशिव :
धाराशिव नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर होताच शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. भारतीय जनता पक्षाने दमदार कामगिरी करत नगर परिषदेत स्पष्ट बहुमत मिळवून आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.
नगराध्यक्षपदाच्या अटीतटीच्या लढतीत भाजपच्या उमेदवार नेहा काकडे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यावर सुमारे २६०० मतांची निर्णायक आघाडी घेत विजय संपादन केला. निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
ही निवडणूक आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आली. त्यांच्या प्रभावी नियोजनामुळे आणि संघटनात्मक ताकदीमुळे भाजपला शहरात मोठे यश मिळाले. विशेष म्हणजे युवा नेते मल्हार पाटील यांनी स्वतः प्रत्येक नगरपरिषद मतदारसंघात प्रत्यक्ष फिरून प्रचार केला, मतदारांशी थेट संवाद साधत पक्षाचा विकासाचा अजेंडा पोहोचवला. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले.
विकासाभिमुख धोरण, स्थानिक प्रश्नांवर केंद्रित प्रचार आणि पक्षातील एकजूट याचा भाजपला मोठा फायदा झाल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे. आगामी काळात शहराच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यात येईल, असा विश्वास पक्षाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.
धाराशिव नगर परिषदेत भाजपला मिळालेल्या या विजयामुळे शहराच्या राजकारणात पक्षाची भूमिका अधिक भक्कम झाली असून, पुढील काळात विकासाचा वेग वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.





















Total views : 4449