नगरपरिषदेनंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे मोर्चा ?
युवा नेतृत्व मल्हार पाटील केंद्रस्थानी
धाराशिव | सय्यद कलीम मुसा
युवा नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे मल्हार पाटील यांनी एकहाती धाराशिव नगरपरिषदेत प्रभावी भूमिका बजावल्यानंतर आता जिल्हा परिषद निवडणुकीचे सूत्र हाती घेणार असल्याची जोरदार चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे. या चर्चांमुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असून, विरोधकांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.
नगरपरिषद पातळीवर संघटनात्मक ताकद दाखवून दिल्यानंतर मल्हार पाटील यांच्या पुढील भूमिकेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या वाढत्या हालचाली, कार्यकर्त्यांशी सुरू असलेले संवाद तसेच बैठकींच्या फेऱ्यांमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
राजकीय निरीक्षकांच्या मते, मल्हार पाटील यांच्या नेतृत्वशैलीमुळे युवकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण झाले असून, त्याचा परिणाम आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या समीकरणांवर होऊ शकतो. त्यामुळे संभाव्य रणनीती ठरवताना विरोधकांकडूनही नव्याने हालचाली सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
दरम्यान, जिल्हा परिषद निवडणुकीबाबत मल्हार पाटील यांच्याकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी कार्यकर्त्यांमधील चर्चा आणि वाढत्या राजकीय हालचालींमुळे धाराशिव जिल्ह्यातील राजकारणाला नवे वळण मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. येत्या काळात या घडामोडी कोणते स्वरूप घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.




















Total views : 4448