विकासासाठी कुदळ हाती घेताच राजकीय वातावरणात खळबळ
अर्चनाताई पाटील यांच्या नावाची जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी जोरदार चर्चा..!!!
धाराशिव | प्रतिनिधी
“घेतली हाती विकासासाठी कुदळ…” या प्रतीकात्मक कृतीतून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील यांनी पुन्हा एकदा राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधून घेतले असून, येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अर्चनाताई पाटील या धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठी प्रबळ दावेदार ठरणार, अशी चर्चा सध्या कार्यकर्त्यांपासून सामान्य नागरिकांपर्यंत रंगताना दिसत आहे.
गेल्या काही दिवसांत विविध ठिकाणी झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमांमुळे अर्चनाताई पाटील यांच्या सक्रियतेची पुन्हा एकदा दखल घेतली जात आहे. ज्या गावांमध्ये आणि सर्कलमध्ये त्यांनी विकासकामांचे भूमिपूजन केले, त्या भागांत “ताई कुठूनही उभ्या राहू द्या, निवडून येणारच” अशी ठाम भावना कार्यकर्त्यांमध्ये व्यक्त होताना दिसत आहे. या चर्चांमुळे राजकीय निरीक्षकांच्या भुवया उंचावल्या असून विरोधकांमध्येही अस्वस्थता वाढल्याचे चित्र आहे.
अर्चनाताई पाटील यांनी यापूर्वी जिल्हा परिषदेत केलेल्या कामांचा आणि विकासाभिमुख भूमिकेचा उल्लेख करत, अनेक कार्यकर्ते त्यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आहेत. निवडणूक अद्याप जाहीर न झालेली असली तरी, त्यांच्या हालचालींमुळे जिल्हा परिषद निवडणुकीच्या राजकारणात एक प्रकारचा ‘राजकीय भूकंप’ जाणवत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, सध्याच्या आचारसंहितेच्या चौकटीत राहूनच सर्व घडामोडी सुरू असल्याचे सांगितले जात असून, येत्या काळात जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना अधिक वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अर्चनाताई पाटील यांच्या पुढील भूमिकेकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.




















Total views : 4448