बळीराजासाठी सावंत यांची पुढाकार; स्वखर्चातून ८० लाखांचा निधी, १६० शेतरस्त्यांना मंजुरी
भूम/परंडा/वाशी : प्रतिनिधी
भूम-परंडा-वाशी मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या दळणवळणाच्या अडचणी दूर करण्यासाठी आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. शेतमाल वाहतुकीस सुलभता यावी, या उद्देशाने त्यांनी स्वखर्चातून ८० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, या निधीतून मतदारसंघातील १६० पानंद (शेत) रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.
सदर निधी जिल्हा परिषद खात्यात आरटीजीएस (RTGS) द्वारे वर्ग करण्यात आला आहे. यानुसार तालुकानिहाय आराखडा तयार करण्यात आला असून, भूम तालुक्यात ६०, परंडा तालुक्यात ६० तर वाशी तालुक्यात ४० शेतरस्त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
दरम्यान, सावंत यांनी दिलेल्या ८० लाखांच्या निधीसोबतच इतर उपलब्ध निधी एकत्र करून एकूण सुमारे २ कोटी ४० लाख रुपयांची कामे हाती घेण्यात येणार आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील दळणवळण सुधारण्यास मदत होणार असून, विशेषतः पावसाळ्यात शेतकऱ्यांना होणारा त्रास कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
या उपक्रमामुळे शेतमालाची वाहतूक सुलभ होणार असून, शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहे.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |




















Total views : 7878