पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात काँग्रेस आक्रमक
धाराशिव जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; इंधन दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी
धाराशिव | प्रतिनिधी
पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या सातत्याने वाढणाऱ्या दरांविरोधात धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीने आक्रमक भूमिका घेत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. सामान्य नागरिक, शेतकरी, छोटे व्यावसायिक आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे आर्थिक गणित इंधन दरवाढीमुळे पूर्णपणे कोलमडले असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
जिल्हाध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आलेल्या निवेदनात केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांवर टीका करण्यात आली. गेल्या काही वर्षांत पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने महागाईचा भडका उडाला असून सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, पेट्रोल-डिझेल दरवाढीचा थेट परिणाम वाहतूक खर्चावर होत असून त्यातून जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, अन्नधान्य यांच्या किंमती सतत वाढत आहेत. दुसरीकडे उत्पन्न स्थिर असल्यामुळे नागरिक आर्थिक संकटात सापडले आहेत.
शेतकऱ्यांवरही या दरवाढीचा मोठा परिणाम होत असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले. ट्रॅक्टर, पंप आणि शेती मशागतीसाठी डिझेल अत्यावश्यक असल्याने शेतीचा खर्च प्रचंड वाढला आहे. त्यामुळे शेती उत्पादन खर्च वाढून महागाई अधिक तीव्र होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
केंद्र सरकारने पेट्रोलियम उत्पादनांवरील कर कमी करून पेट्रोल-डिझेल व घरगुती गॅसच्या दरवाढीला तात्काळ आळा घालावा, तसेच इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या निवेदनावर काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या असून, नागरिकांच्या प्रश्नांसाठी काँग्रेस रस्त्यावर उतरल्याचे चित्र धाराशिवमध्ये पाहायला मिळत आहे.























Total views : 12798