घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला अटक ; ४५ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त
धाराशिव : जिल्ह्यातील घरफोडीच्या गुन्ह्यांचा छडा लावत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोठी कारवाई करत अट्टल घरफोड्या करणाऱ्या आरोपीला जेरबंद केले आहे. आरोपीकडून तब्बल १८ तोळे सोन्याचे दागिने व इतर मुद्देमालासह ४५ लाख ३५ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० मे रोजी पोलिस निरीक्षक विनोद इप्परवार यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सुभा परिसरात सापळा रचून आरोपीच्या शोधात होते. यावेळी संशयित अजय श्रावण शिंदे यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने जिल्ह्यातील विविध ठिकाणी घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली.
तपासादरम्यान आरोपीने पोहरे बंबळी, बोरीखेडा, धाराशिव शहर, शिराढोण, कळंब, लोहरा, तुळजापूर, येडशी तसेच अहमदनगर जिल्ह्यातील घरफोड्यांची माहिती दिली. पोलिसांनी त्याच्याकडून १८ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले. तसेच चोरीतील काही सोने विकून मिळालेल्या पैशातून एक दुचाकी खरेदी केल्याचेही निष्पन्न झाले.
या कारवाईत एकूण ४५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, जिल्ह्यातील अनेक घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल होण्यास मदत झाली आहे.
ही कारवाई पोलिस अधीक्षक ऋतु खोकर, अपर पोलिस अधीक्षक सतीन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इप्परवार यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पथकात पोलिस उपनिरीक्षक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत आरोपीला अटक करून पुढील तपास सुरू केला आहे.
घरफोडीच्या मालिकेचा पर्दाफाश करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला मोठे यश मिळाल्याने नागरिकांमधून पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.



















Total views : 12978