आमदार तानाजीराव सावंत यांच्या निधीतून इंदापूरमध्ये विकासकामांचा शुभारंभ
श्री कृष्ण मंदिर सभागृहासाठी १५ लाखांचा निधी; मान्यवरांच्या उपस्थितीत भूमिपूजन उत्साहात
इंदापूर (ता. वाशी) : भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या आमदार निधीतून इंदापूर येथील श्री कृष्ण मंदिर सभागृह बांधकामासाठी १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या विकासकामाचे भूमिपूजन आज उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.
गावातील सामाजिक, धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना चालना मिळावी या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या सभागृहामुळे ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या कार्यक्रमास भैरवनाथ शुगरचे व्हाईस चेअरमन केशव सावंत यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच मान्यवर, पदाधिकारी, ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी आमदार डॉ. तानाजीराव सावंत यांच्या विकासाभिमुख नेतृत्वाचे कौतुक करताना, मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासकामांना प्राधान्य दिले जात असल्याचे सांगितले. इंदापूरच्या सामाजिक व धार्मिक विकासासाठी हे सभागृह महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
आमदार सावंत यांच्या माध्यमातून मतदारसंघात रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण, आरोग्य तसेच धार्मिक स्थळांच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत असून, सर्वांगीण विकासाचा संकल्प प्रत्यक्षात उतरविण्याचे काम सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.





















Total views : 12295