वाशी तालुक्यात ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते’ योजनेला गती; पारगाव मंडळात २५ कि.मी. रस्त्यांच्या कामाचा धडाका!
आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांची वनवास संपणार; तहसीलदार व पदाधिकाऱ्यांकडून प्रत्यक्ष कामाची पाहणी.
वाशी (प्रतिनिधी):
स्वातंत्र्यानंतर अनेक दशके लोटली तरी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी रस्ते उपलब्ध नव्हते. मात्र, आता धाराशिव जिल्ह्यातील वाशी तालुक्यातील शेतकऱ्यांचा हा वनवास संपणार आहे. भूम-परांडा-वाशी मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे माजीआरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वाखाली ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते’ योजनेच्या कामाला वाशी तालुक्यात मोठी गती मिळाली आहे. या योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात पारगाव मंडळात तब्बल २५ किलोमीटर रस्त्यांचे काम पूर्ण केले जाणार असून, प्रत्यक्ष कामाची पाहणी प्रशासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींकडून नुकताच करण्यात आली आहे.
नुकतीच या कामांची पाहणी वाशीचे तहसीलदार प्रकाश म्हेत्रे, शिवसेना उपतालुका प्रमुख तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विकास तळेकर आणि पारगाव मंडळातील तलाठी व महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली. पावसाळ्यात ज्या ठिकाणी साधे वाहनदेखील जाऊ शकत नव्हते, अशा ठिकाणी आता खडीकरण व मजबुतीकरण करून दर्जेदार रस्ते तयार केले जात आहेत. हे काम करताना गुणवत्तेशी कोणतीही तडजोड करू नका, असे कडक आदेश आमदार सावंत यांनी प्रशासनाला दिले आहेत.
पारगाव मंडळातील २५ कि.मी. चे काम पूर्ण झाल्यानंतर, ही योजना वाशी तालुक्यातील प्रत्येक गावात राबवण्यात येणार आहे. ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्यांची अडचण आहे, तिथे हे रस्ते प्राधान्याने केले जातील. यामुळे शेतकऱ्यांना शेतीमाल बाजारात नेणे सोपे होणार असून, ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे.
प्रशासकीय निधीची वाट न पाहता ‘सावंत पॅटर्न’ने रस्ते मार्गी
गेल्या दहा वर्षांपासून आमदार तानाजीराव सावंत यांनी मतदारसंघात विकासाची नवी व्याख्या मांडली आहे. अनेक ठिकाणी प्रशासकीय निधीची किंवा तांत्रिक मंजुरीची वाट न पाहता, शेतकऱ्यांची निकड ओळखून त्यांनी स्वतःच्या खर्चातून अनेक किलोमीटरचे रस्ते स्वखर्चातून पूर्ण करून दिले आहेत. आता शासन स्तरावरून ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते’ योजनेचे नियोजन करण्यात आले असून, या समितीचे अध्यक्ष स्वतः तानाजीराव सावंत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पारगाव मंडळातील कामे प्रायोगिक तत्त्वावर हाती घेण्यात आली आहेत.
“शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे, पण पावसाळ्यात चिखलातून चालताना त्याचे जे हाल होतात ते शब्दांत मांडता येणार नाहीत. ना. प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेबांनी ही वेदना ओळखून सातत्याने स्वतःच्या खिशातून रस्ते केले. आता ‘मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते’ योजनेच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक बांधापर्यंत रस्ता पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहोत. पारगाव मंडळातील २५ किलोमीटरचे रस्ते हे केवळ सुरुवात असून, साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्रत्येक अडिचण असलेल्या ठिकाणी दर्जेदार रस्ते करून शेतकऱ्यांचा ‘शिवार’ सुजलाम सुफलाम करण्याचा आमचा मानस आहे.”
— सौ. सविता विकास तळेकर > (सदस्या, जिल्हा परिषद)




















Total views : 12295