माणुसकी अजून जिवंत आहे…! मृत अर्भकाच्या दफनविधीसाठी आशाताई कांबळे यांची संवेदनशील धाव
धाराशिव : “नियतीपुढे माणूसच काय, तर निसर्गसुद्धा हतबल ठरतो,” याची प्रचिती रविवारी धाराशिव येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेतून पुन्हा एकदा आली. मात्र या वेदनादायी प्रसंगातही माणुसकीचा हात पुढे करत सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या आशाताई कांबळे यांनी दाखविलेली संवेदनशीलता समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
रविवारी दुपारी साडेअकराच्या सुमारास वैद्यकीय समाजसेवा अधीक्षक नवनाथ सरवदे यांनी आशाताई कांबळे यांना फोन करून एका मृत अर्भकाच्या दफनविधीसाठी मदतीची विनंती केली. अपघातात जखमी झालेल्या गर्भवती महिलेवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. ती महिला परजिल्ह्यातील ऊसतोड कामगार कुटुंबातील असून तिच्या नातेवाईकांकडे आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची होती.
फोन मिळताच आशाताई यांनी तातडीने कार्यालयातून रजा घेतली. कपिलधारा स्मशानभूमीतील गणेश गंधेवाड यांना संपर्क करून दफनविधीसाठी खड्डा तयार ठेवण्यास सांगितले. त्यानंतर आवश्यक साहित्य, नवीन कपडा, मीठ आणि फुले घेऊन त्या थेट सरकारी रुग्णालयात दाखल झाल्या.
घटनेची माहिती घेतल्यानंतर समोर आलेली हकीकत मन सुन्न करणारी होती. परभणीकडे निघालेल्या ऊसतोड कामगार दाम्पत्याचा तुळजापूर महामार्गावर अपघात झाला होता. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना प्रथम तुळजापूर आणि नंतर धाराशिव येथे हलविण्यात आले. सात महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेच्या पोटातील बाळ दगावले होते. मात्र डॉक्टरांनी अथक प्रयत्न करत महिलेचे प्राण वाचवले.
यानंतर मृत अर्भक नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. आशाताई कांबळे, नवनाथ सरवदे, महेश पाटील आणि मंगेशकुमार अन्नमवार यांनी नातेवाईकांसोबत कपिलधारा स्मशानभूमीत जाऊन विधीपूर्वक दफनविधी पार पाडला. खोक्यात ठेवलेले ते पूर्ण वाढ झालेले निष्प्राण बालक पाहून उपस्थितांचे मन हेलावून गेले. जड अंतःकरणाने सर्वांनी मिळून त्या अर्भकाला अखेरचा निरोप दिला.
या प्रसंगी गणेश गंधेवाड यांनीही कोणताही आर्थिक आग्रह न धरता माणुसकी जपत सहकार्य केले. तसेच नवनाथ सरवदे यांनी रिक्षा खर्चाची जबाबदारी उचलली.
“ही पोस्ट प्रसिद्धीसाठी नसून संकटात सापडलेल्या व्यक्तींना माणुसकीच्या भावनेतून मदत करण्याची प्रेरणा मिळावी, हा एकमेव उद्देश आहे,” अशी भावना आशाताई कांबळे यांनी व्यक्त केली.
दरम्यान, डॉक्टरांनी वेळेवर उपचार करून महिलेचे प्राण वाचवल्याबद्दल नातेवाईकांनी वैद्यकीय पथकाचे आभार मानले. या संपूर्ण घटनेने उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू आणले, तर समाजात माणुसकी अजूनही जिवंत असल्याचा विश्वास अधिक दृढ केला.
























Total views : 12317