जवळा प्राथमिक आरोग्य केंद्रास सभापती आण्णासाहेब जाधव यांची धावती भेट; वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याच्या सूचना
परंडा : ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम आणि सुविधायुक्त व्हावी, या उद्देशाने शिवसेना तालुकाप्रमुख परंडा तथा नवनिर्वाचित सभापती आण्णासाहेब जाधव यांनी जवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास धावती भेट देत तेथील विविध विभागांची पाहणी केली.
यावेळी सभापती आण्णासाहेब जाधव यांनी आरोग्य केंद्रातील सुविधा, रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवा तसेच कर्मचाऱ्यांकडून विविध बाबींची सविस्तर माहिती घेतली. पाहणीदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्रातील वीजपुरवठ्याबाबत गंभीर समस्या निदर्शनास आली. महावितरणच्या ढिसाळ कारभारामुळे आरोग्य केंद्रातील विद्युत सेवा विस्कळीत होत असल्याचे समोर आले.
या पार्श्वभूमीवर सभापती जाधव यांनी कोणताही विलंब न करता संबंधित महावितरण अभियंत्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधून प्राथमिक आरोग्य केंद्रातील वीजपुरवठा पुढील दोन दिवसांत २४ तास सुरळीत सुरू ठेवण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. आरोग्य सेवेमध्ये कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी पंचायत समिती सदस्य तथा गटनेते अमोल नलवडे, शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख शहाजी ढोरे पाटील, अमर ओव्हाळ आदी उपस्थित होते.
दरम्यान, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांबाबत सभापती आण्णासाहेब जाधव यांनी घेतलेली तत्पर भूमिका नागरिकांमधून कौतुकास पात्र ठरत आहे.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |





















Total views : 12319