बार्शी-लातूर रस्त्यावर दरोडेखोरांचा हैदोस?
एरंडगाव-येडशी टप्प्यात ट्रक लुटीचा प्रयत्न; चालकांमध्ये भीतीचे वातावरण
लातूर/धाराशिव, प्रतिनिधी : लातूर-बार्शी रोडवर एरंडगाव आणि येडशीदरम्यानच्या टप्प्यात एका आयशर ट्रकला अडवून लुटण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खराब रस्त्याचा फायदा घेत अज्ञातांनी ट्रक थांबवून गाडीतील काही केल्याचे डबे लांबविल्याची माहिती समोर आल्याने वाहन चालक आणि मालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लातूरहून पुण्याकडे निघालेला आयशर ट्रक एरंडगाव-येडशी मार्गावरील खराब रस्त्यामुळे संथ गतीने जात असताना काही संशयितांनी गाडीला लक्ष्य केले. यावेळी वाहन अडवून माल लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. घटनेनंतर संबंधित चालकाने कसाबसा प्रसंगावधान राखत पुढे मार्ग काढल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेनंतर महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. विशेषतः एरंडगाव ते येडशी हा टप्पा सध्या वाहन चालकांसाठी धोकादायक ठरत असल्याची भावना व्यक्त होत आहे. ट्रक, ट्रॅव्हल्स, चारचाकी वाहने यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप वाहन चालक आणि मालकांकडून केला जात आहे.
स्थानिक नागरिक व वाहनधारकांमध्ये याबाबत तीव्र संताप व्यक्त होत असून, “रस्त्यांची दुरवस्था कायम असताना सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पोलिस प्रशासन नेमके काय करत आहे?” असा सवाल उपस्थित केला जात आहे. खराब रस्त्यांमुळे वाहनांचा वेग कमी होत असल्याने दरोडेखोरांना संधी मिळत असल्याचे चालकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, या मार्गावर रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढविण्याची मागणी जोर धरत आहे. रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करून महामार्ग सुरक्षित करावा, तसेच लुटीच्या घटनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी वाहन चालक, मालक आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.
ठळक मुद्दे
▪️ एरंडगाव-येडशी दरम्यान ट्रक लुटीचा प्रयत्न.
▪️ खराब रस्त्यामुळे वाहनांची गती मंदावल्याचा गैरफायदा.
▪️ ट्रक, ट्रॅव्हल्स आणि चारचाकी वाहनचालकांमध्ये भीती.
▪️ महामार्गावर पोलिस गस्त वाढविण्याची मागणी.
▪️ सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.





















Total views : 12800