गांजा विक्री करणाऱ्या आरोपीला ठोकल्या बेड्या; ८० हजारांचा मुद्देमाल जप्त
धाराशिव | प्रतिनिधी
धोकी पोलिसांनी अवैध गांजा विक्रीविरोधात धडक कारवाई करत एका आरोपीला अटक करून तब्बल ८० हजार रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. या कारवाईमुळे परिसरात अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २७ मे २०२६ रोजी पोलिस ठाणे धोकीचे प्रभारी अधिकारी सपोनि विलास हजारे यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, टेर येथील इसम अच्युत प्रभू पवार हा गांजाची खुलेआम विक्री करत आहे. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी तात्काळ सापळा रचत कारवाई केली.
धोकी परिसरातील एका ढाब्यासमोर संशयित आरोपी थांबलेला असताना पोलिस पथकाने त्याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान आरोपीच्या ताब्यातून हिरव्या रंगाचा उग्र वास असलेला तब्बल १६०० ग्रॅम गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे ८० हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी अच्युत प्रभू पवार (वय ४५, रा. टेर, ता. धाराशिव) याच्याविरोधात धोकी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, एनडीपीएस कायद्यान्वये पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक रितू खोखर, अपर पोलिस अधीक्षक सचिन पांढरकर, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विलास हजारे, पोहेकॉ. माठे, तांबडे, लोहार, काळे, तसेच पोलिस अंमलदार शिंदे, खांडेकर, पाटील आदींच्या पथकाने केली.





















Total views : 12798