बदलाची सुरुवात स्वतःपासून; आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची बायोडिझेलला पसंती
धाराशिव | प्रतिनिधी
पर्यावरण संवर्धन आणि स्वच्छ ऊर्जेच्या वापरासाठी जनतेला संदेश देताना केवळ भाषणांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष कृतीतून आदर्श निर्माण करण्याचे काम आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केले आहे. देशाला ऊर्जा क्षेत्रात आत्मनिर्भर बनविण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पाला बळ देण्यासाठी त्यांनी स्वतःच्या चारचाकी वाहनात ‘अभिलाषा रिन्युएबल डिझेल’ अर्थात बायोडिझेल भरून यशस्वी ड्रायव्हिंग टेस्ट घेतली.
या चाचणीदरम्यान वाहनाचा परफॉर्मन्स अत्यंत समाधानकारक राहिल्याचे त्यांनी नमूद केले. पारंपरिक इंधनावरील वाढते अवलंबित्व, इंधनाच्या वाढत्या किमती आणि पर्यावरणासमोरील गंभीर आव्हाने लक्षात घेता जैव-इंधन हा प्रभावी आणि शाश्वत पर्याय ठरू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
वायू प्रदूषण कमी करून भावी पिढीला स्वच्छ आणि निरोगी वातावरण देण्यासाठी बायोडिझेलचा वापर काळाची गरज असल्याचे सांगत, पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार करण्याचे आवाहन आमदार पाटील यांनी नागरिकांना केले.
“बदलाची अपेक्षा इतरांकडून करण्यापेक्षा त्याची सुरुवात स्वतःपासून करणे अधिक महत्त्वाचे आहे,” असा संदेश देत त्यांनी हरित ऊर्जा आणि पर्यावरण संरक्षणाच्या मोहिमेत सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन केले.
ऊर्जा आत्मनिर्भरता, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकास यांचा समतोल साधण्याच्या दिशेने आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे हे पाऊल महत्त्वपूर्ण मानले जात असून त्यांच्या या उपक्रमाचे विविध स्तरांतून स्वागत होत आहे.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |




















Total views : 13893