धाराशिवात बालकामगार मुक्ती अभियानाची धडक कारवाई; दोन किशोरवयीन कामगारांची सुटका
धाराशिव | प्रतिनिधी
बालकामगार व किशोरवयीन कामगार निर्मूलनासाठी शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विशेष मोहिमेअंतर्गत धाराशिव शहरात संयुक्त पथकाने धडक कारवाई करत दोन किशोरवयीन कामगारांची सुटका केली. या प्रकरणी संबंधित आस्थापना मालकाविरुद्ध विविध कामगार कायद्यांतर्गत कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
कामगार उपायुक्त छत्रपती संभाजीनगर विभागाचे मा. नितीन पाटणकर यांच्या निदर्शनानुसार तसेच सरकारी कामगार अधिकारी गोविंद गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ११ जून २०२६ रोजी बाल व किशोरवयीन कामगार मुक्ती अभियान राबविण्यात आले.
या मोहिमेदरम्यान धाराशिव शहरातील समर्थ नगर परिसरातील एका बेकरीच्या गोदामावर संयुक्त तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान तेथे दोन किशोरवयीन कामगार काम करत असल्याचे आढळून आले. त्यानंतर संबंधित मुलांना तात्काळ ताब्यात घेऊन बाल कल्याण समितीसमोर हजर करण्यात आले.
तपासणीदरम्यान संबंधित मालकाविरुद्ध विविध कामगार कायद्यांच्या अनुषंगाने निरीक्षण नोंदी करण्यात आल्या असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. बालकामगारांना रोजगार देणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाईचा इशाराही प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
सदर कारवाई दुकाने निरीक्षक सचिन अरबट यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यामध्ये नितीन गोरे, वैभव गोरे, शरद ढवळे यांच्यासह सरकारी कामगार कार्यालयाचे कर्मचारी सहभागी झाले होते. तसेच जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे प्रतिनिधी अभय काळे, पोलीस प्रशासन आणि जिल्हा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनीही संयुक्तपणे सहभाग घेतला.
बालकामगारमुक्त समाज घडविण्याच्या उद्देशाने अशा प्रकारच्या कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले असून, अल्पवयीन मुलांना कामावर ठेवणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली जाणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. :::




















Total views : 13888