बालकामगारांविरोधात धाराशिवचा एल्गार; शहरभर जनजागृतीची व्यापक मोहीम
धाराशिव | प्रतिनिधी
जागतिक बालकामगार विरोधी दिनानिमित्त धाराशिव शहरात बालकामगार प्रथेविरोधात व्यापक जनजागृती मोहीम राबविण्यात आली. जिल्हाधिकारी तथा जिल्हा बाल कामगार कृती समितीचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांच्या हस्ते स्वाक्षरी अभियानाला प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमात महिला व बाल विकास विभाग, कामगार विभाग तसेच विविध शासकीय कार्यालयांतील अधिकारी-कर्मचारी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून बालकामगारमुक्त समाजाचा निर्धार व्यक्त केला.
कामगार उपायुक्त नितीन पाटणकर यांच्या निर्देशानुसार व सरकारी कामगार अधिकारी गोविंद गावंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या मोहिमेत शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, बसस्थानक परिसर आणि गर्दीच्या ठिकाणी जनजागृती फेरी काढण्यात आली. बालकामगार प्रथा ही मुलांच्या शिक्षण, आरोग्य आणि उज्ज्वल भवितव्यावर घाला घालणारी गंभीर सामाजिक समस्या असल्याचे यावेळी नागरिकांना पटवून देण्यात आले.
मोहीमेदरम्यान व्यावसायिक आस्थापना, दुकानदार आणि उद्योजकांना बालकामगार न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच बालकामगार आढळल्यास संबंधित यंत्रणांना तात्काळ माहिती देण्याचे आवाहनही करण्यात आले. विविध ठिकाणी जनजागृतीपर पोस्टर्स लावून नागरिकांमध्ये कायदेशीर तरतुदी आणि बालहक्कांविषयी माहिती पोहोचविण्यात आली.
बालपण सुरक्षित राहिले तरच देशाचे भविष्य उज्ज्वल होईल, या संदेशासह राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे धाराशिव शहरात बालकामगार निर्मूलनाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून सामाजिक जबाबदारीची जाणीव अधिक दृढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.


















Total views : 13899