“भूम–परंड्यात नव्या आघाड्यांचे राजकारण रंगात!
सर्वपक्षीय हालचालींनी निवडणुकीचा पट तापला”
भूम–परंडा : दोन्ही नगरपरिषदांकडे सर्वपक्षीय नजरा, नवीन गठजोडींच्या चर्चा जोरात:-( सय्यद कलीम मुसा )
भूम आणि परंडा नगरपरिषदांच्या आगामी निवडणुकांना काहीच दिवस उरले असताना, राजकीय हालचालींनी दोन्ही शहरांत वेगळेच वातावरण निर्माण केले आहे. सोशल मीडियावर एकत्रित फोटोंचे सत्र सुरू असून, “आमचं ठरलंय!” अशा वाक्यांनी नवीन आघाड्यांचे संकेत मिळत आहेत.
परंड्यात सावंत गटाची पकड, तरीही विरोधी गटांची मोर्चेबांधणी सुरू
२०१६ च्या निवडणुकीपासून परंडा नगरपरिषदेत प्रा. तानाजीराव सावंत यांचे राजकीय नेतृत्व प्रभावी राहिले. शहराच्या विकासासाठी स्थिर नेतृत्व आवश्यक असल्याचे मान्य करत जाकीरभाई सौदागर यांनी सावंत यांच्यासोबत राहून विधानसभा निवडणुकीत मोठी मतदानाची आघाडी देत आपली भूमिका स्पष्ट केली.
शहरात त्यानंतरचा विकास–विषयक प्रवास सातत्याने सुरू असताना, आता माजी आमदार राहुल मोटे, सुजितसिंह ठाकूर, तसेच दिवंगत आमदार तात्या पाटील यांचे सुपुत्र रंजीत पाटील यांच्यासह भाजप, काँग्रेस, शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) येत्या निवडणुकीसाठी एकत्र येण्याच्या चर्चेत असल्याचे सोशल मीडियावर दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मात्र तटस्थ भूमिका घेत“महाविकास आघाडीचा ज्या दिशेने निर्णय जाईल, त्यानुसार भूमिका ठरवू,”असा अधिकृत पवित्रा दर्शवत आहे.
भूममध्येही नवी राजकीय संधिसाधूगिरी? गाढवे गटासमोर सर्वपक्षीय आव्हान उभे
भूम शहरात अनेक वर्षांपासून संजय नाना गाढवे यांनी प्रशासकीय कामकाज, समन्वय आणि विकासाच्या योजनांमधून आपला मजबूत प्रभाव जपला आहे. शहरातील त्यांची लोकप्रियता आणि विकास योजनांची अंमलबजावणी यामुळे त्यांच्याकडे मतदारांचा स्पष्ट कल जाणवतो.तरीही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधी गटांनी भूममध्ये मोठ्या प्रमाणात एकत्रित हालचाली सुरू केल्या आहेत.माजी नगराध्यक्ष कुटुंबातील धनाजीराव थोरात, यशवंत थोरात यांच्यासह भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्थानिक पातळीवरील पदाधिकारी व नेते एकत्र येत असल्याचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
यामुळे भूममध्येही सावंत–गाढवे नेतृत्वाला सर्वपक्षीय आव्हान उभे केले जात असल्याची चर्चेला जोर आला आहे.
दोनही नगरपरिषदा : एका बाजूला स्थिर नेतृत्व, तर दुसऱ्या बाजूस नव्या आघाडीचा दावा
भूम आणि परंड्यात एकीकडे सत्तेचं सातत्य राखण्यासाठी सावंत समर्थकांची तयारी दिसत आहे, तर दुसरीकडे विविध पक्षांचे नेते “एकत्र येण्याचा” जोरदार प्रयत्न करत असल्याने निवडणुकीत अभूतपूर्व चुरस दिसणार आहे.
कोणता गट प्रत्यक्षात मैदानात उतरणार? कोणता गट उमेदवार जाहीर करणार?
हे प्रश्न उत्तरे मिळेपर्यंत दोन्ही शहरातील राजकारण उत्सुकतेच्या टप्प्यावर पोहोचले आहे.
नगराध्यक्ष पदाची नावं चर्चेत, पण नगरसेवक उमेदवार ‘गुप्त’
जरी आघाड्या तयार होताना दिसत असल्या तरी कोणत्या बाजूने कोणते चेहरे उमेदवार म्हणून समोर येणार याबाबत अजूनही कोणतीही अधिकृत घोषणा नाही. त्यामुळे मतदारांमध्येही उत्सुकता अधिक वाढली आहे.





















Total views : 4449