धाराशिव जिल्हा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा महत्वाचा संघटनात्मक निर्णय
धाराशिव दि. ६ (प्रतिनिधी) :
मुंबई येथे आज झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हानिहाय आढावा बैठकीत धाराशिव आणि कळंब नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण संघटनात्मक निर्णय घेण्यात आला. या बैठकीत दोन्ही नगरपालिकांच्या निवडणूक प्रक्रियेचे नियोजन, समन्वय व दिशानिर्देशनाची जबाबदारी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस सुरेश साहेबराव पाटील यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती मिळते.
बैठकीस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, आमदार विक्रम काळे, आमदार राहुल मोटे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश बिरजदार तसेच जिल्हाध्यक्ष महेंद्र दुर्गुडे यांनी उपस्थित राहून जिल्ह्यातील संघटनात्मक हालचालींवर चर्चा केली.
या निर्णयामुळे जिल्ह्यातील पक्ष संघटनाला नवीन ऊर्जा मिळाल्याचे कार्यकर्त्यांमधून समजते. येणाऱ्या निवडणुकांसाठी पक्षाची संघटनात्मक तयारी, संघटन बळकटीकरण, स्थानिक प्रश्नांचे विश्लेषण आणि पुढील कार्ययोजना अधिक वेगाने राबवण्यात येणार असल्याचे पक्ष सूत्रांकडून सांगण्यात आले.
धाराशिव व कळंब या दोन्ही नगरपालिकांसाठी समन्वयित आणि नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याचा पक्षाचा मानस असून, आगामी प्रक्रियेत सर्व स्तरांवरील कार्यकर्त्यांच्या सहभागावर भर देण्यात येणार आहे.





















Total views : 4449