अतिवृष्टीने खचलेल्या शेतकऱ्यांना तातडीने अनुदान द्या!
लाल फितीचा विलंब सहन केला जाणार नाही.” – आमदार तानाजी सावंत
अतिवृष्टीने होरपळलेल्या बळीराज्यासाठी आमदार तानाजी सावंतांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन .
( सय्यद कलीम मुसा ): धाराशिव जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीने बळीराजाचे आयुष्य अक्षरशः उधळून टाकले आहे. शेतीचे प्रचंड नुकसान, ओढाताण आणि सरकारी मदतीची थांबलेली प्रतीक्षा यामुळे शेतकरी आर्थिक आणि मानसिक दोन्ही पातळ्यांवर कोलमडला आहे. या तणावग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांच्या योग्य हक्कांसाठी भुम-परंडा-वाशी मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना तातडीचे निवेदन सादर करून मदत वितरण जलदगतीने करण्याची मागणी केली.
आमदार सावंत यांनी ठाम भूमिका मांडताना म्हटले की, “केंद्र आणि राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेली मदत तातडीने शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलीच पाहिजे. लाल फितीचा विलंब सहन केला जाणार नाही.”
त्यांनी विशेषत्वाने निदर्शनास आणले की अनेक शेतकऱ्यांचे अनुदान फक्त ‘फार्मर आयडी’ च्या गुंतागुंतीच्या प्रक्रियेमुळे तहसील आणि तलाठी कार्यालयांमध्ये प्रलंबित आहे. प्रशासनातील ही दिरंगाई शेतकऱ्यांच्या जखमांवर आणखी घाव घालत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
आमदार सावंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्टपणे सूचना दिल्या की तहसीलदार व मंडल अधिकाऱ्यांना तात्काळ आदेश देऊन ‘फार्मर आयडी’ संदर्भातील अडचणी दूर कराव्यात कोणत्याही कारणास्तव अनुदान वितरणात विलंब होऊ नये .वारसदार आणि समाईक खातेदारांचे अनुदानही प्राधान्याने वितरित करावे एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये .
या निवेदनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रतिसादाच्या वेगाकडे संपूर्ण धाराशिव जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांचा न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच राहील, असा स्पष्ट संदेश या निवेदनातून देण्यात आला असल्याची चर्चा जिल्ह्यात रंगत आहे.





















Total views : 4449