अचलेर परिसरात वेळा अमावस्या उत्साहात साजरी
( शेतकऱ्यांसह बालगोपालांनी लुटला वनभोजनाचा आनंद)
अचलेर प्रतिनिधी : जगदीश सुरवसे
लोहारा तालुक्यातील अचलेर तसेच परिसरातील आष्टा कासार, आलूर, बोरगाव, सिंदगाव, सलगर, कुनसावळी, बेळंब व केसरजवळगा या गावांमध्ये मार्गशीर्ष अमावस्येनिमित्त वेळा अमावस्या हा सण शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा केला.
मूळ कर्नाटकातील असलेला हा सण महाराष्ट्रातील सोलापूर, धाराशिव व लातूर जिल्ह्यांसह शेजारील तालुक्यांमध्ये मोठ्या श्रद्धेने पाळला जातो. मार्गशीर्ष अमावस्या ही ‘दर्श वेळा अमावस्या’ म्हणूनही ओळखली जाते. कानडी भाषेतील “येळ्ळ अमावस्या” (पेरणीनंतर येणारी सातवी अमावस्या) या शब्दाचा अपभ्रंश होऊन ‘वेळा अमावस्या’ हे नाव रूढ झाले आहे.
या दिवशी अचलेर व या परिसरातील शेतकरी कुटुंबीयांसह शेताकडे रवाना झाले. आदल्या दिवशी कडब्यापासून तयार केलेल्या कोपीमध्ये शेतातील सर्व पिकांची तसेच मातीपासून बनवलेल्या पांडवांची (पंचमहाभूतांचे प्रतीक) विधीवत पूजा करण्यात आली. काळ्याआईची ओटी भरून शेतीच्या भरभराटीसाठी प्रार्थना करण्यात आली.
वेळा अमावस्येनिमित्त अनेक शेतकरी आपल्या सजवलेल्या बैलजोड्या व बैलगाडीतून नातेवाईक, मित्रपरिवारासह डोक्यावर आंबीलाची गाडगी घेऊन शेताकडे गेले. शेतात सर्वांनी एकत्र येत पारंपरिक वनभोजनाचा आनंद घेतला. भाजीपाला एकत्र करून तयार केलेली भज्जी, ज्वारी-बाजरीचे उंडे, शेगा पोळी, खीर, आंबट भात तसेच या सणाचा खास पदार्थ आंबील या पंचपक्वानांचा सर्वांनी मनसोक्त आस्वाद घेतला.
वनभोजनानंतर सायंकाळी आनंदात बैलगाडीतून घरी परतताना पारंपरिक उत्साह दिसून आला. सायंकाळी अचलेर गावात वेळा अमावस्येनिमित्त पोलिस पाटील शिवपुत्र पाटील यांच्या मानाचे दिवे तसेच म्हातारी डालाची मिरवणूक काढण्यात आली.
शेतकरी कुटुंबे, मित्रमंडळे तसेच बालगोपाल मोठ्या संख्येने एकत्र येत हा सण सामूहिक आनंदाने साजरा झाल्याने अचलेर परिसरात उत्सवमय वातावरण निर्माण झाले होते.





















Total views : 4449