ग्रामीण स्पर्श रुग्णालय सास्तुरने खरंच मनाला स्पर्श केला .
नवजात बाळाला कावीळ झाल्यानंतर तत्काळ व मोफत उपचार; आईकडून डॉक्टर व रुग्णालयाचे मनःपूर्वक आभार
धाराशिव जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातील सास्तुर येथील ग्रामीण स्पर्श रुग्णालयाने माणुसकी आणि आरोग्यसेवेचा आदर्श दाखवून दिला आहे. नवजात बाळाला कावीळ झाल्यानंतर वेळेत योग्य उपचार मिळाल्याने बाळाची प्रकृती सुधारत असून, या सेवेमुळे कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे.
याबाबत माहिती देताना सौ. वाहिदा कलीम सय्यद (मूळ राहणार माकणी, सध्या धाराशिव) यांनी सांगितले की, बाळाला कावीळ झाल्याचे लक्षात येताच त्यांनी तात्काळ पतींना माहिती दिली. त्यानंतर औसा येथील बालरोग तज्ञ डॉ. मुसांडे सर यांच्याशी संपर्क साधून तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर बाळाला कावीळ असल्याचे निदान झाले व फोटोथेरेपी घेण्याचा सल्ला देण्यात आला.
यानंतर पतींनी सास्तुर येथील ग्रामीण स्पर्श रुग्णालयाचे प्रकल्प अधिकारी व रिजनल हेड श्री. रमाकांत भास्करराव जोशी यांच्याशी संपर्क साधून संपूर्ण परिस्थिती सांगितली. त्यांनी तात्काळ रुग्णालयात येण्यास सांगून उपचारांची सर्व व्यवस्था केली.
सध्या सास्तुर येथील ग्रामीण स्पर्श रुग्णालयात नवजात बाळावर फोटोथेरेपी उपचार सुरू असून, कोणताही आर्थिक भार न देता उपचार दिले जात आहेत, ही बाब उल्लेखनीय आहे. या उपचारांची बालरोग तज्ञ डॉ. मोनाली मुसांडे स्वतः नियमित देखरेख करत असून, रुग्णालयातील डॉक्टर, नर्सिंग स्टाफ व कर्मचारी अत्यंत आपुलकीने व जबाबदारीने सेवा देत आहेत.
“हे रुग्णालय केवळ उपचार देत नाही, तर रुग्णांच्या वेदना समजून घेतं. स्वच्छ, सुंदर आणि शांत वातावरण, तसेच मायाळू डॉक्टर व कर्मचारी यामुळे आम्हाला मोठा आधार मिळाला. ग्रामीण स्पर्श रुग्णालयाने खरंच मनाला स्पर्श केला आहे. मी मनःपूर्वक आभार व्यक्त करते,” असे सौ. वाहिदा कलीम सय्यद यांनी भावनिक शब्दांत सांगितले.
ग्रामीण भागातही दर्जेदार, तत्काळ आणि संवेदनशील आरोग्यसेवा देणारे सास्तुर येथील ग्रामीण स्पर्श रुग्णालय हे रुग्णसेवेचे उत्तम उदाहरण ठरत आहे, असे मत सौ. वहिदा कलीम सय्यद यांनी व्यक्त केले आहे





















Total views : 4449