सभापतीपद हुकल्याने लोहाऱ्यात शिवसैनिक संतप्त; सुवर्णाताई पाटील यांना डावलल्याचा आरोप
जळकोट / प्रतिनिधी : सचिन व्ही कदम
धाराशिव जिल्हा परिषदेत सभापती पदाच्या निवड प्रक्रियेत सुवर्णाताई सतीश पाटील यांना संधी नाकारण्यात आल्याने लोहारा शहरातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी उसळली आहे. पक्षाच्या निर्णयावर उघडपणे नाराजी व्यक्त करत कार्यकर्त्यांनी हा निर्णय अन्यायकारक असल्याचा आरोप केला आहे.
सुवर्णाताई पाटील यांना सभापतीपदापासून दूर ठेवण्यात आल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून, पक्ष नेतृत्वाने याची गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे. काही कार्यकर्त्यांनी पक्षाच्या धोरणांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
दरम्यान, शिवसेना पक्षाच्या उपगटनेते पदावर सुवर्णाताई सतीश पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून, युवासेना लोकसभा प्रमुख म्हणून आनंद पाटील यांची निवड करण्यात आली आहे. मात्र, या नियुक्त्यांनंतरही कार्यकर्त्यांमधील नाराजी कमी झालेली नसल्याचे दिसून येत आहे.
या प्रसंगी आयुब (गुड्डू) पठाण, आयशा पठाण, नसरीन शेख, यासिन शेख, रियाज शेख, रियाज पठाण, इरफान शेख, सादिक फुलारी आदी उपस्थित होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी आगामी काळात तीव्र भूमिका घेण्याचा इशाराही दिला असून, या प्रकरणामुळे लोहारा परिसरातील शिवसेना संघटनेत अस्वस्थता निर्माण झाल्याचे चित्र आहे.



















Total views : 7581