नमस्ते धाराशिवचे संपादक संदीप कोकाटे यांना धमकी; कळंबमध्ये दोघांविरुद्ध गुन्हा
कळंब, ता. ५ : NCMC (राष्ट्रीय सामान्य गतिशीलता कार्ड) गैरव्यवहार प्रकरणात बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून ‘नमस्ते धाराशिव’चे संपादक संदीप कोकाटे यांना धमकावल्याची घटना समोर आली असून, याप्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कळंब आगारात NCMC कार्ड काढण्यासाठी शासनाने निश्चित केलेल्या शुल्कापेक्षा अधिक रक्कम नागरिकांकडून वसूल केली जात असल्याची बाब समोर आली होती. या गैरप्रकाराबाबत संदीप कोकाटे यांनी ‘नमस्ते धाराशिव’च्या माध्यमातून बातमी प्रसिद्ध केली होती.
दरम्यान, ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर संगमेश मेनकुदळे व धीरज उर्फ लाला मालपाणी यांनी संबंधित पत्रकारावर बातमी डिलीट करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली. सुरुवातीला भावनिक विनवण्या व आमिष दाखविण्यात आले; मात्र त्यास प्रतिसाद न मिळाल्याने गुरुवारी (ता. २) रात्री सुमारे ११ वाजता कोकाटे यांच्या कार्यालयात जाऊन धमक्या दिल्याचा आरोप आहे. तसेच पुन्हा भेटून बातमी डिलीट न केल्यास परिणाम भोगावे लागतील, खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची व बदनामी करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
या प्रकरणी कळंब पोलिस ठाण्यात संगमेश मेनकुदळे व धीरज उर्फ लाला मालपाणी यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 351(2), 3(5) तसेच महाराष्ट्र प्रसार माध्यम व्यक्ती आणि प्रसार माध्यम संस्था (हिंसा व मालमत्तेचे नुकसान प्रतिबंध) अधिनियमाच्या कलम 3 व 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, संपादक संदीप कोकाटे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेत, “मला बातमी डिलीट करण्यासाठी सातत्याने दबाव टाकला जात असून, संबंधितांकडून धमक्या दिल्या जात आहेत. यामुळे माझ्या व माझ्या कुटुंबाच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. तसेच प्रसार माध्यम संस्थेच्या व खासगी मालमत्तेच्या नुकसानीची शक्यता आहे,” असे त्यांनी सांगितले.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |



















Total views : 7882