कळंब पोलीस स्टेशनकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन; उन्हाळ्यात चोरीच्या घटनांमुळे खबरदारीच्या सूचना जारी
कळंब : पोलीस स्टेशन कळंब हद्दीतील सर्व नागरिकांना उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सध्या अनेकजण गच्चीवर झोपण्यासाठी जात असल्याने घरातील रोख रक्कम व दागिने सुरक्षित ठिकाणी ठेवावेत, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
पोलीस प्रशासनाच्या माहितीनुसार, परिसरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून मसा, हासेगाव बोर्डा आदी ठिकाणी यापूर्वी चोरीच्या घटना घडल्या आहेत. संबंधित घरातील सदस्य बाजूच्या खोलीत किंवा गच्चीवर झोपलेले असताना चोरट्यांनी हात साफ केल्याचे समोर आले आहे.
त्यामुळे नागरिकांनी घरातील मौल्यवान दागिने, रोख रक्कम लॉकरमध्ये किंवा सुरक्षित ठिकाणी ठेवावी. बाहेरगावी जाताना घरात दागिने किंवा रोकड ठेवू नये. तसेच शेजाऱ्यांना घराकडे लक्ष ठेवण्यास सांगावे व पोलीस पाटील यांनाही माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
गावागावात रात्रीच्या गस्तीसाठी पथके तयार करण्याचे निर्देश देण्यात आले असून पोलीस पाटील व बिट अमलदार यांनी नागरिकांना सतर्कतेच्या सूचना द्याव्यात, गस्त पथके तयार करून त्यांची नावे व मोबाईल क्रमांकाची यादी पोलीस स्टेशनला सादर करावी, असे सांगण्यात आले आहे.
तसेच बिट अधिकारी व बिट अमलदार यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावाला भेट देऊन बैठक घ्यावी आणि गस्त पथके तयार करावीत, असे निर्देश देण्यात आले आहेत.
चोरीची घटना घडल्यास किंवा संशयास्पद हालचाली दिसल्यास तात्काळ डायल 112 वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी आपल्या घरांवर CCTV कॅमेरे बसवावेत तसेच ग्रामपंचायतींनी गावातील बंद पडलेले कॅमेरे सुरू करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही पोलिसांनी नमूद केले आहे.
सदर सूचना प्रत्येक गावातील सोशल मीडिया ग्रुपवर पाठविण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |



















Total views : 9545