सावंत यांच्या आदेशानुसार ‘गाव भेट दौरा’ला उत्स्फूर्त प्रतिसाद
विशाल बापू ढगे यांचा जनसंपर्क वाढला; नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी थेट गावपातळीवर संवाद
भूम, प्रतिनिधी : भूम-परंडा-वाशी मतदारसंघाचे माजी आरोग्यमंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या ‘गाव भेट दौऱ्याला’ ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या दौऱ्याअंतर्गत सभापती विशाल बापू ढगे गावोगावी भेटी देत नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेत असून त्या सोडविण्यासाठी संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करीत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या दौऱ्यात विविध गावांमधील पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य, शिक्षण तसेच इतर मूलभूत सुविधांबाबत नागरिकांशी थेट संवाद साधण्यात येत आहे. गावकऱ्यांनी मांडलेल्या समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू असून अनेक प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
यावेळी बोलताना विशाल बापू ढगे यांनी, “सावंत साहेबांनी दिलेल्या सूचनेनुसार जनतेच्या दारी जाऊन त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्या सोडविण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणे हेच आमचे ध्येय आहे. सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असे सांगितले.
या गावभेट दौऱ्याला विविध स्तरांवरील पदाधिकारी, माजी व विद्यमान लोकप्रतिनिधी, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य तसेच कार्यकर्त्यांचेही सहकार्य लाभत आहे. विशेष म्हणजे, गावोगावी नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून अनेक ठिकाणी उत्साहाचे आणि मेळाव्यासारखे वातावरण पाहायला मिळत आहे.
सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत ग्रामीण भागातील नागरिक विकासकामांना प्राधान्य देण्याची अपेक्षा व्यक्त करीत आहेत. गावभेट दौऱ्यामुळे नागरिक आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संवाद अधिक मजबूत होत असून मतदारसंघातील विकासकामांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
ठळक बाब
“जनतेच्या दारी जाऊन समस्या जाणून घ्या आणि त्या सोडवा,” या तत्त्वावर सुरू असलेल्या गावभेट दौऱ्यामुळे ग्रामीण भागात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून नागरिकांचा वाढता प्रतिसाद लक्षवेधी ठरत आहे.




















Total views : 12806