धाराशिवमध्ये ११ लाखांच्या गोवंशाची सुटका; पशुतस्करी करणाऱ्यांवर एलसीबीचा मोठा दणका
पहाटेच्या कारवाईत जनावरांनी भरलेला ट्रक जप्त; गुन्हा दाखल
धाराशिव, प्रतिनिधी : धाराशिव जिल्ह्यात पशुतस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) मोठी कारवाई करत तब्बल ११ लाख ३० हजार रुपये किमतीच्या १६ गोवंश जनावरांची सुटका केली. या कारवाईत जनावरांची अमानुष पद्धतीने वाहतूक करणारा ट्रक जप्त करण्यात आला असून संबंधित चालकाविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना गुप्त माहिती मिळाली होती की, धाराशिव ग्रामीण परिसरातून गोवंश जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक केली जात आहे. या माहितीच्या आधारे एलसीबीच्या पथकाने सापळा रचून संशयित वाहनाला अडविले.
वाहनाची तपासणी केली असता ट्रकमध्ये १६ गोवंश जनावरे अत्यंत दाटीवाटीने व अमानुष पद्धतीने कोंबून ठेवलेली आढळून आली. जनावरांना हालचाल करण्यासाठीही पुरेशी जागा नसल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ जनावरांची सुटका करून वाहनासह मुद्देमाल जप्त केला.
या कारवाईत गोवंश जनावरे व वाहन असा एकूण ११ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संबंधित चालकाविरुद्ध प्राणी क्रूरता प्रतिबंधक अधिनियम १९६०, महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९९५ तसेच इतर संबंधित कायद्यांनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास धाराशिव ग्रामीण पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार भोगे करीत आहेत.
ही कारवाई पोलिस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार, पोलिस हवालदार दत्तात्रय राठोड, समाधान वाघमारे, ज्ञानेश गायकवाड, पोलिस नाईक अशोक बंगे व पोलिस अंमलदार प्रकाश बोर्डेवार यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
बॉक्स
पशुतस्करीविरोधात एलसीबीचा धडाकेबाज अॅक्शन मोड
धाराशिव जिल्ह्यात अवैध धंदे, चोरी आणि पशुतस्करीविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने गेल्या काही दिवसांत सातत्याने कारवाया सुरू ठेवल्या आहेत. या कारवाईमुळे पशुतस्करी करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून पोलिसांच्या कठोर भूमिकेचे नागरिकांकडून स्वागत होत आहे.




















Total views : 12806