आज सायंकाळी एक अतिशय संवेदनशील आणि मन हेलावून टाकणारी घटना घडली. सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत मी आणि मातोश्री आश्रमच्या व्यवस्थापिका अनुजा ताई एका बेवारस आजोबांची सोय करण्यासाठी बाहेर पडलो आणि त्यातून घडलेली ही संपूर्ण घटना तुमच्यासमोर मांडत आहे.
बेवारस वृद्धाला आधार… श्रीनिवास कुलकर्णी यांच्या वेळेवर दिलेल्या संदेशामुळे जीव वाचला
सायंकाळी मी मातोश्री क्लिनिक (बँक कॉलनी रोड, धाराशिव) येथे बसले होते. एवढ्यात व्हॉट्सअॅप उघडलं आणि साधारण 7.30 वाजता माझ्या मेसेजमध्ये श्रीनिवास यशवंत कुलकर्णी यांचा संदेश दिसला—
“Madam namaskar
मी वरुडा ब्रीज खालून घरी येत असताना पुलाखाली एक वृद्ध व्यक्ती बसलेली दिसते आहे.
येता जाता प्रत्येकाला मदत मागत आहे. काही समजत नाही कोण आहे, कुठून आलेला आहे!”
संदेश वाचताच मी तात्काळ श्रीनिवास भय्याला फोन करून अधिक माहिती घेतली. त्यांनी फोटो नसल्याचं सांगितल्यावर मला थेट त्या ठिकाणी जाणं आवश्यक वाटलं.
मी डॉ. गपाट सरांच्या मातोश्री क्लिनिकमध्ये श्रीनिवास भय्याला बोलावून घेतलं आणि आम्ही दोघं त्या ठिकाणी पोहोचलो.
‘महेश देशमुख’ नावाचे वृद्ध… मानसिकदृष्ट्या स्थिर परंतु पूर्णपणे बेघर
त्या वृद्ध व्यक्तीकडे पाहिल्यावर सुरुवातीला ते मानसिकरुग्ण असल्याचं वाटलं, पण जवळ जाऊन संवाद साधला तेव्हा ते पूर्ण शुद्धीत व सामान्य वृत्तीचे असल्याचं लक्षात आलं.
त्यांनी स्वतःचं नाव महेश देशमुख, मूळचे कोकणातील, गेल्या चार महिने चार दिवस रस्त्यावर भटकंती करत असल्याचं सांगितलं.
नातेवाईक कोणी नाही… पुढे कुठे जायचं याचाही पत्ता नाही.
मी त्यांना राहण्याची सोय करण्याची तयारी दर्शवली आणि त्यांनी तात्काळ होकार दिला.
अचानक थांबलेली एक कार… ‘अबुबकर बागवान’ यांची माणुसकी!
मी आणि भय्या त्यांच्या जवळ थांबलो असताना अनेक लोक आम्हाला पाहून पुढे जात होते.
तेवढ्यात एक चारचाकी थांबली. मला वाटलं त्यांना काही अडचण असेल… पण त्या व्यक्तीने (नाव – अबुबकर बागवान, फॉर्म तिकोटा, कर्नाटक) कारची डिक्की उघडून एक पॅकेट काढलं आणि त्या बेघर व्यक्तीच्या हातात दिलं.
ही माणुसकी खरोखर हृदयाला भिडणारी होती.
मातोश्री आश्रमात सुरक्षित दाखल
तेवढ्यात अनुजा ताई आणि ब्रम्हदेव दादा करवर रिक्षासह आले.
महेश दादांना रिक्षात बसवून आम्ही थेट मातोश्री आश्रम, MIDC, धाराशिव येथे नेलं.
त्यांच्या अंगावर घाणेरडी वास येणारी अवस्था होती.
करण दादांनी त्यांना अंघोळ घातली.
अनुजा ताईंनी स्वच्छ कपडे दिले.
अंघोळीनंतर पोटभर जेवण दिलं.
ते हसत-गप्पा मारत आमच्याशी मिसळले आणि म्हणाले—
“आता आश्रम सोडून कुठेही जाणार नाही.”
ते स्वामी समर्थ भक्तही असल्याचं सांगितलं.
या संवेदनशील कार्याचं संपूर्ण श्रेय – श्रीनिवास कुलकर्णी
जर श्रीनिवास भय्याने वेळेवर मेसेज केला नसता, तर एवढ्या थंडीत तो बेघर वृद्ध पुन्हा रस्त्यावर भटकत राहिला असता… किती दिवस, किती महिने, देव जाणे!
श्रीनिवास भय्या, तुझे मनापासून आभार.
अशीच सामाजिक बांधिलकी जपत राहो ही मनःपूर्वक शुभेच्छा 🌹
– आशाताई कांबळे, धाराशिव
📞 9850649702
टीप :
बेवारस व्यक्ती आढळल्यास नक्की संपर्क करा. एका जीवाला आश्रय मिळणं म्हणजे एखाद्या घराला भाग्य मिळणं आहे.































Total views : 4449