धाराशिव पालिकेवर 128 कोटींची बोजा कोणामुळे?
माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांचा महाविकास आघाडीला सवाल
शिवसेना, भाजपासह आताच्या शिवसेना शिंदे सेनेचे जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी सन 2016 ते 2022 या कार्यकाळात झालेल्या कामांची शासनाने चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यानुसार शासनाकडून लेखापरिक्षण करण्यात आले. ही चौकशी कुठेतरी काळेबेरे सुरू होते म्हणूनच झाली होती. मागील कार्यकाळात शिवसेनेच्या आमदार, खासदार आणि माजी नगराध्यक्षाने मिळून केलेला भ्रष्टाचार लेखा परिक्षणा अहवालातून समोर आला आहे. हा अहवालच त्यांचा आरसा असल्याची टीका माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांनी पत्रकार परिषदेत केली.
प्रतिष्ठान भवन येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेस माजी नगराध्यक्ष सुभाष काकडे, जिल्हा संघटक अॅड. नितीन भोसले उपस्थित होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, 128 कोटी रूपये नगरपरिषदेने वेगवेगळ्या कारणांसाठी देणे बाकी आहे. एकेकाळी स्वनिधीतून मुदतठेवी करणारी नगरपरिषद आज मागील कार्यकाळातील कारभार्यांमुळे देणेकरी झाली. सध्या धाराशिवची नगरपरिषद 128 कोटींचे देणे आहे. लेखा परिक्षणानुसार आस्थापनेवरचे 55 लाख, आरोग्य विभागाने 15 कोटी 69 लाख देणे आहे, इलेक्ट्रीकमध्ये वीजबिल 28 कोटी, पाणी पुरवठ्याचे 30 कोटी, सिव्हीलचे 8 कोटी 15 लाख, स्टोअर कोटी 59 लाख, अकाउंट विभागाचे 1 कोटी 27 लाख रूपये देणे नगरपरिषदेला झालेले आहे. या चौकशी अहवालाची संचिका चौकशी समितीने मागीतली असता, अंतिम चौकशी अहवाल उपलब्ध नसल्याचे कळविले. मग याला जबाबदार कोण? हे जनतेला कळले आहे. हे चौकशी अहवाल विरोधकांचा आरसा आहे. भ्रष्ट कारभाराने विरोधकांनी आपली ओळख निर्माण केली आहे.
नगरपरिषदेत पूर्वी प्रत्येक महिन्यात 20 तारखेला जनता दरबार भरत होता. या दरबारात विकासाच्या संकल्पना मांडल्या जात होत्या, नागरी समस्या सोडविल्या जात होत्या. आमदार राणाजगजितसिंह पाटील हे त्यावेळी सर्वांच्या समस्या सोडवित होते व आजही ते सोडवित आहेत. परंतु विरोधकांनी मागील कार्यकाळात राबविलेल्या सर्व योजना सपशेल फेल गेल्या आहेत. प्रत्येक कामात भ्रष्टाचार आहे. भ्रष्टाचारामुळे गुत्तेदाराला पळून जावे लागले, हे दुर्दैव आहे. बारापैकी सात विभागात आपल्या सत्ता काळात पाईपलाईन अंथरून शहराला 24 तास पाणी देण्याचा संकल्प पूर्ण झाला असता. आज आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे जर सत्ता राहिली असती तर शहराची आज असलेली बकाल अवस्था दिसली नसती. मात्र मागील कार्यकाळातील सत्ताधार्यांनी नियोजन करून भ्रष्टाचार केला आणि शहराची अशी बकाल अवस्था झाली.
अस्तित्वात नसलेल्या कितीतरी कामांवर जनतेचे पैसे खर्च दाखवून नगरपरिषदेला लुटलेले आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील हे सुसंस्कारित लोकप्रतिनिधी आहेत. त्यांच्याबद्दल कुणीही काहीही बोलले तरी, ते संस्कार विसरीत नाहीत. मात्र विरोधकांकडून आपले कर्तत्व झाकून ठेवून काहीही बोलले जात आहे. माजी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांच्या कार्यकाळात आमदार, खासदारांनी मिळून काय दिवे लावले हे जनतेला कळले आहे. त्यामुळे आता सत्तांतर निश्चित घडेल, आणि शहरवासीय भ्रष्ट विरोधकांना आरसा दाखवून देतील, असेही माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर यांनी सांगितले.





















Total views : 4449