पर्यटन व रोजगार टिकवण्यासाठी महामार्ग सुरक्षिततेची मागणी
(ॲड. व्यंकट गुंड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना केले निवेदन)
धाराशिव, दि. — धाराशिव–बीड (सोलापूर–धुळे) राष्ट्रीय महामार्गावर अलीकडील काळात लुटमारी, चोरी, जबरी मारहाण, चेन स्नॅचिंग आणि वाहनचालकांना अडवून दहशत निर्माण करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याच्या पार्श्वभूमीवर ॲड. व्यंकट गुंड (संस्थापक – रुपामाता उद्योग समूह व प्रदेश कार्यकारिणी सदस्य, भाजप) यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले.
येरमाळा ते वाशी पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही ब्लॅकस्पॉटवर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याने सामान्य नागरिक, प्रवासी आणि व्यावसायिक वर्गामध्ये भीतीचे वातावरण तयार झाले आहे. विशेषत: तुळजाभवानी माता आणि येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी महाराष्ट्रासह इतर राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक या मार्गाने प्रवास करतात. त्यांच्या सुरक्षेवर लुटमारीचा परिणाम होत असून, भाविकांमध्ये भीती आणि असुरक्षिततेची भावना वाढीस लागल्याचे निवेदनात नमूद केले आहे.
या भाविकांमुळे तुळजापूर, कळंब, वाशी परिसरातील हॉटेल व्यवसाय, लाँज, पर्यटन सेवा, वाहतूक, स्थानिक दुकाने आणि यात्रेवर आधारित रोजगार मोठ्या प्रमाणात टिकून आहेत. महामार्गावरील अशा घटनांमुळे भविष्यात भाविकांची संख्या कमी होण्याची शक्यता निर्माण होत असून, पर्यटन, स्थानिक व्यवसाय आणि रोजगार व्यवस्थेवर गंभीर परिणाम होऊ नये, यावर निवेदनात विशेष भर देण्यात आला.
निवेदनात ॲड. गुंड यांनी स्पष्ट केले आहे की, धाराशिव जिल्हा पोलीस प्रशासन सक्षम आहे, अनुभवी आहे आणि जिल्ह्याची कायदा-सुव्यवस्था मजबूत ठेवण्यासाठी सदैव तत्पर आहे. त्यामुळे महामार्गावरील सुरक्षेला अधिक बळकटी देण्यासाठी पोलीस विभागाने तातडीने आवश्यक त्या उपाययोजना करतील, असा पूर्ण विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
महामार्ग प्रवासी, स्थानिक नागरिक व भाविकांसाठी सुरक्षित व्हावा, तसेच जिल्ह्याचे पर्यटन, अर्थकारण आणि सामाजिक जीवन अखंडपणे सुरळीत राहावे, या उद्देशाने हे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षकांना सादर करण्यात आले.





















Total views : 4449