सय्यद कलीम मुसा
आशा भगिनींच्या सन्मानासाठी पडद्यावर ‘आशा’
लेडीज क्लब, धाराशिव यांचा संवेदनशील आणि प्रेरणादायी उपक्रम .
धाराशिव : – समाजाच्या आरोग्य व्यवस्थेचा खरा आधार असलेल्या आशा कार्यकर्त्यांच्या निस्वार्थ सेवेला मानाचा मुजरा करत लेडीज क्लब, धाराशिव यांच्या पुढाकाराने एक हृदयस्पर्शी आणि आदर्श उपक्रम साकार झाला. आशा कार्यकर्त्यांच्या जीवनावर आधारित ‘आशा’ या मराठी चित्रपटाचे मोफत विशेष प्रदर्शन धाराशिव शहरातील प्रसिद्ध ताजमहाल टॉकीज येथे मोठ्या उत्साहात पार पडले. आरोग्यसेवेच्या आघाडीवर दिवस-रात्र झटणाऱ्या आशा भगिनींसाठी हा कार्यक्रम सन्मान, आत्मविश्वास आणि भावनिक समाधान देणारा ठरला.
या विशेष कार्यक्रमाचा शुभारंभ आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत, आशा कार्यकर्त्यांच्या हस्ते केक कापून करण्यात आला. पडद्यावर साकारलेली कथा ही अनेक आशा भगिनींच्या स्वतःच्या आयुष्याशी मिळतीजुळती असल्याने सभागृहात अनेक क्षणी भावूक शांतता अनुभवायला मिळाली.
लेडीज क्लबच्या आवाहनाला प्रतिसाद देत जिल्ह्याच्या विविध तालुका व गावांतून मोठ्या संख्येने आशा भगिनी या विशेष प्रदर्शनासाठी उपस्थित राहिल्या. रोजच्या कामाचा प्रचंड ताण, जबाबदाऱ्या आणि वेळेची मर्यादा यामुळे हा चित्रपट पाहण्याची संधी मिळेल की नाही, अशी शंका अनेकांच्या मनात होती. मात्र लेडीज क्लबच्या सामाजिक जाणिवेतून घेतलेल्या पुढाकारामुळे ही संधी प्रत्यक्षात आल्याने उपस्थित आशा कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि अभिमान स्पष्टपणे दिसत होता.
कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर सभागृहात एक आपुलकीचे वातावरण निर्माण झाले. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सौ. अर्चनाताई राणाजगजितसिंह पाटील यांच्याशी संवाद साधताना अनेक आशा भगिनींनी आपल्या कार्यातील अनुभव, अडचणी आणि यशकथा मनमोकळेपणाने सांगितल्या. याच वेळी सौ. अर्चनाताईंशी सेल्फी काढण्याचा मोह अनेक आशा कार्यकर्त्यांना आवरता आला नाही. आपल्या कार्याची दखल घेणाऱ्या आणि सन्मानाने वागणाऱ्या नेतृत्वासोबतचा हा क्षण त्यांनी आनंदाने कॅमेऱ्यात टिपून ठेवला.
सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू (आर्ची) हिची प्रमुख भूमिका असलेला ‘आशा’ हा चित्रपट आशा कार्यकर्त्यांच्या निस्वार्थ सेवाभावाचे, संघर्षाचे आणि त्यागाचे वास्तववादी व संवेदनशील चित्रण करतो. ग्रामीण व शहरी भागातील आरोग्यसेवा, महिलांचे सक्षमीकरण, मातृत्व आरोग्य, जनजागृती आणि समाजासाठी केलेल्या अथक प्रयत्नांचे प्रभावी दर्शन या चित्रपटातून घडते. प्रत्येक आशा भगिनीला अभिमान वाटावा, आत्मविश्वास मिळावा आणि आपल्या कार्याची समाजाकडून दखल घेतली जात असल्याची जाणीव करून देणारा हा चित्रपट ठरतो.
लेडीज क्लब, धाराशिव यांनी राबविलेला हा उपक्रम केवळ चित्रपट प्रदर्शनापुरता मर्यादित न राहता आशा कार्यकर्त्यांच्या सेवेला दिलेला सन्मान ठरला. समाजाच्या आरोग्यासाठी शांतपणे, न थकता झटणाऱ्या आशा भगिनींसाठी हा दिवस कायम स्मरणात राहणारा ठरला असून, अशा संवेदनशील उपक्रमांमुळे सामाजिक जाणीव अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.





























































Total views : 4449