“हार के जितने वाले को बाजीगर कहते है अवघ्या नऊ मतांनी पराभव, तरीही ठसठशीत छाप; प्रभाग 9 मध्ये मोनिका रसाळ यांची लढत लक्षवेधी
धाराशिव प्रतिनिधी
तुळजापूर नगरपरिषद निवडणुकीतील प्रभाग क्रमांक 9 मध्ये काँग्रेसच्या महिला उमेदवार मोनिका श्रीकांत रसाळ यांना अवघ्या नऊ मतांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला. अत्यंत अटीतटीच्या आणि चुरशीच्या लढतीत काही मोजक्या मतांमुळे निकाल बदलला असला, तरीही या निवडणुकीत रसाळ यांनी उमटवलेली ठसठशीत छाप सर्वांचे लक्ष वेधून घेणारी ठरली आहे.
राष्ट्रीय स्तरावरील खो-खो स्पर्धेत पारितोषिक मिळवलेल्या खेळाडू, उच्च शिक्षित आणि स्वच्छ प्रतिमेच्या उमेदवार म्हणून रसाळ यांनी निवडणुकीत प्रवेश केला होता. शिस्त, मेहनत, संघभावना आणि चिकाटी या क्रीडाक्षेत्रातील मूल्यांचा प्रभाव त्यांच्या प्रचारात स्पष्टपणे दिसून आला. अल्प कालावधीत त्यांनी प्रभागातील विविध भागांत प्रत्यक्ष संवाद साधत मतदारांशी थेट संपर्क ठेवला.
विशेषतः महिला मतदारांमध्ये रसाळ यांना मोठा प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसून आले. महिला सुरक्षेचे प्रश्न, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य व स्थानिक मूलभूत सुविधा यासंदर्भात त्यांनी मांडलेली भूमिका स्पष्ट, व्यवहार्य आणि स्थानिक गरजांशी सुसंगत असल्याचे मत अनेक नागरिकांनी व्यक्त केले.
त्यांच्या प्रचाराला सामाजिक कार्याचीही मजबूत पार्श्वभूमी होती. पती श्रीकांत रसाळ यांच्या माध्यमातून वर्षानुवर्षे सुरू असलेले सामाजिक कार्य, अडचणीत असलेल्या नागरिकांना मदत, युवकांना शिक्षण व रोजगाराबाबत मार्गदर्शन, स्थानिक प्रश्नांवर समन्वय साधून तोडगा काढण्याचा अनुभव यामुळे रसाळ कुटुंबाला प्रभागात विश्वासार्ह ओळख मिळाली आहे.
अवघ्या नऊ मतांनी झालेला पराभव हा विजयापासून अत्यंत जवळचा ठरल्याने, राजकीय वर्तुळात “नवा महिला चेहरा म्हणून मोनिका रसाळ यांनी प्रभावी सुरुवात केली” अशी चर्चा सुरू आहे. पहिल्याच निवडणुकीत इतक्या कमी फरकाने झालेला पराभव हा त्यांच्या राजकीय प्रवासातील अनुभव ठरून पुढील काळात त्यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहणार आहे.
या पार्श्वभूमीवर, पराभव असूनही आत्मविश्वास, लढाऊ वृत्ती आणि लोकसंपर्काची ताकद दाखवणाऱ्या मोनिका रसाळ यांच्या बाबतीत,
“हार के जितने वाले को बाजीगर कहते है” या म्हणीचा प्रत्यय प्रभाग क्रमांक 9 मधील निवडणुकीत आल्याचे बोलले जात आहे.





















Total views : 4449