पडद्यामागचा खंबीर आधार; भाजपच्या यशामागील शिल्पकाराचा गौरव
धाराशिव, दि. २४ (प्रतिनिधी):
धाराशिव जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका निवडणुकांत भारतीय जनता पक्षाला मिळालेले दणदणीत यश केवळ प्रचाराच्या झगमगाटापुरते मर्यादित नव्हते; तर त्यामागे शांतपणे, सातत्याने आणि निष्ठेने काम करणाऱ्या पडद्यामागील कार्यकर्त्यांची भक्कम फळी होती. या यशाचा एक महत्त्वाचा आधार ठरलेले मनोगत उर्फ पिंचूभैया शिनगारे यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या कार्याची जाहीर दखल घेण्यात आली.
भाजपचे प्रमुख नेते आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या हस्ते भाजपा कार्यालय, प्रतिष्ठान भवन येथे झालेल्या या कार्यक्रमात शिनगारे यांच्या योगदानाचा यथोचित गौरव करण्यात आला. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मनोगत उर्फ पिंचूभैया शिनगारे यांचे कार्य हे केवळ अलीकडील निवडणुकीपुरते मर्यादित नाही. राज्याचे माजी गृहमंत्री व उपमुख्यमंत्री पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबाशी त्यांचे बालपणापासूनचे नाते असून, अनेक वर्षांपासून ते संघटनात्मक जबाबदाऱ्या अत्यंत विश्वासार्हतेने सांभाळत आले आहेत. प्रसिद्धीपासून दूर राहून रणनीती आखणे, कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणे आणि स्थानिक परिस्थितीचा अचूक अंदाज घेणे, ही त्यांची ओळख राहिली आहे.
या निवडणुकीत आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी सोपवलेली जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. जिल्ह्यातील विविध नगरपालिका मतदारसंघांत संघटन मजबूत ठेवणे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय राखणे आणि प्रत्येक टप्प्यावर योग्य नियोजन करणे, यामुळे भाजपच्या उमेदवारांना निर्णायक विजयाकडे नेण्यात त्यांचा मोलाचा वाटा राहिला.
सत्कारप्रसंगी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी शिनगारे यांच्या कार्याची मुक्तकंठाने प्रशंसा करत, “पक्षाच्या यशामागे अनेकदा न दिसणारे हात असतात; मनोगत शिनगारे हे त्याचे उत्तम उदाहरण आहेत,” असे गौरवोद्गार काढले.
या वेळी बोलताना मनोगत उर्फ पिंचूभैया शिनगारे यांनी, “ही केवळ वैयक्तिक कामगिरी नसून, नेतृत्वाने दिलेल्या विश्वासाचे फलित आहे. तो विश्वास कायम जपणे, हेच माझे कर्तव्य आहे,” अशी भावना व्यक्त केली.
या सन्मानामुळे जिल्ह्यातील सामान्य कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, निष्ठा, परिश्रम आणि संघटनशक्ती यांना मिळालेली ही दाद भाजपसाठी नव्या उर्जेचे प्रतीक ठरत आहे.






















Total views : 4449