वाढत्या डिझेल दरामुळे चालक-मालक संघटना आक्रमक; प्रति टन ५० रुपये वाढीची मागणी
धाराशिव : वाढत्या इंधन दरामुळे वाहतूक व्यवसाय आर्थिक संकटात सापडला असून वाहतूक भाड्यामध्ये प्रति टन ५० रुपये वाढ करण्यात यावी, अशी मागणी चालक-मालक वाहतूक संघटना, धाराशिव यांच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात सर्व ठेकेदारांना निवेदन देण्यात येणार आहे.
संघटनेच्या निवेदनात म्हटले आहे की, डिझेलच्या दरामध्ये सातत्याने वाढ होत असून प्रत्येक वेळी प्रतिलिटर २ ते ३ रुपयांनी वाढ होत आहे. त्यामुळे वाहतूक व्यवसाय करणे अत्यंत कठीण बनले आहे. इंधनासोबतच वाहनांचे मेंटेनन्स, टायर, स्पेअर पार्ट्स, विमा, टोल आदी खर्चामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मात्र, त्या तुलनेत वाहतूक भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नसल्याने चालक-मालकांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.
वाहनांचे हप्ते, कर्जाचे व्याज आणि वाढता घरखर्च भागविताना चालक-मालक हतबल झाले असून अनेकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच गाडी खाली करताना प्रत्येक दुकानात हमाली द्यावी लागत असल्याने चालक-मालकांवर आर्थिक भार वाढत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ही प्रथा तात्काळ बंद करण्यात यावी तसेच पूर्ण भाडे “साफी साफी” देण्यात यावे, अशी मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे.
वाहतूक भाड्यामध्ये प्रति टन ५० रुपये वाढ केल्यास चालक-मालकांना काही प्रमाणात आर्थिक दिलासा मिळेल, असा विश्वास संघटनेने व्यक्त केला आहे. तसेच संबंधित ठेकेदारांनी चालक-मालकांच्या अडचणी समजून घेऊन न्याय्य निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.
© Copyright - Dainik Trishakti News All rights reserved. |





















Total views : 12314