“सुनील चव्हाण ठरणार का भाजपचा नवा चेहरा?”
स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीत नावाची जोरदार चर्चा; भाजपमध्ये इच्छुकांची चुरस वाढली
प्रतिनिधी : त्रिशक्ती | धाराशिव
उस्मानाबाद–लातूर–बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीची चाहूल लागताच भाजपमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे. उमेदवारीसाठी अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली असतानाच सहकार क्षेत्रातील प्रभावी नेतृत्व म्हणून ओळख असलेले सुनील मधुकरराव चव्हाण यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भाजपचे भक्कम संख्याबळ असल्याने ही निवडणूक पक्षासाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे. लातूर, बीड आणि धाराशिव या तिन्ही जिल्ह्यांत भाजपचे मजबूत संघटन असल्यामुळे उमेदवारीवरून पक्षांतर्गत चुरस निर्माण झाली आहे.
राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चेनुसार, मागील विधान परिषद निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुरेश धस यांच्या विजयासाठी सुनील चव्हाण यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सातत्याने काम केले. लोकसभा निवडणुकीपासून ते विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांनी पक्षाच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतल्याचे बोलले जाते.
२०२४ च्या विधानसभा निवडणुकीत राणाजगजितसिंह पाटील यांच्या प्रचारातही त्यांनी प्रभावी जबाबदारी सांभाळली होती. नगरपालिका, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी त्यांनी केलेल्या कामाची चर्चा सध्या भाजपच्या गोटात सुरू आहे.
अणदूर येथील रहिवासी असलेले सुनील चव्हाण यांनी सहकार क्षेत्रातही ठसा उमटवला आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे संचालक आणि अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. ग्रामीण भागातील त्यांचा दांडगा संपर्क आणि सहकार क्षेत्रातील अनुभव हे त्यांचे बलस्थान मानले जात आहे.
दरम्यान, धाराशिव जिल्ह्यातून माजी मंत्री बसवराज पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांच्यासह सुनील चव्हाण यांच्या नावाची चर्चा अधिक वेगाने पुढे येत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांतील राजकीय गणिते आणि पक्ष संघटनातील सक्रियता लक्षात घेता भाजप नेतृत्व अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने घेणार, याकडे तिन्ही जिल्ह्यांचे लक्ष लागले आहे.
आगामी काळात भाजपमधील ही राजकीय चुरस आणखी रंगण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.




















Total views : 12315