शासकीय सेवा की त्रासाची साखळी? संतप्त मातांची तक्रार; जबाबदारांवर कारवाईची मागणी
धाराशिव | प्रतिनिधी :
जिल्हा स्त्री रुग्णालय धाराशिव येथे लहान बाळांना लसीकरणासाठी येणाऱ्या मातांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या प्रकारामुळे शहरात संतापाची लाट उसळली असून शासकीय आरोग्य सेवेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
माहितीनुसार, लसीकरणासाठी वेळेवर येणाऱ्या महिलांना तासन्तास थांबवले जाते, त्यांच्याशी उद्धट भाषेत संवाद साधला जातो आणि अनेक वेळा सेवा मिळवण्यासाठी विनवण्या कराव्या लागतात. लहान बाळांच्या आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या या प्रक्रियेदरम्यानच अशा प्रकारची वागणूक मिळत असल्याने संबंधित यंत्रणेच्या संवेदनशीलतेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
काही संतप्त मातांनी प्रतिक्रिया देताना सांगितले,
“आम्ही बाळांना घेऊन वेळेवर येतो, पण इथे आम्हाला कोणी व्यवस्थित उत्तर देत नाही. उलट अपमानास्पद बोलले जाते. शासकीय रुग्णालयात अशी वागणूक मिळणे अत्यंत वेदनादायक आहे.”
या प्रकरणात संबंधित अधिकारी कांबळे यांची भूमिकाही चर्चेत आली आहे. “कर्मचाऱ्यांच्या अशा वागणुकीकडे दुर्लक्ष करून त्यांना पाठीशी घातले जात आहे का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर शंका निर्माण झाली आहे.
दरम्यान, स्थानिक नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी या प्रकाराची तात्काळ चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा येत्या काळात आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
प्रश्न कायम :
आई-बाळाच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कारवाई होणार का?
रुग्णालयातील गैरप्रकारांना आळा बसणार का?
जबाबदार अधिकारी मौन का बाळगून आहेत?
चौकट : –
धाराशिवच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातील हा प्रकार केवळ एका रुग्णालयापुरता मर्यादित नसून, तो संपूर्ण आरोग्य यंत्रणेतील उदासीनतेचे द्योतक ठरत आहे. आता तरी प्रशासन जागे होऊन आई-बाळांच्या सन्मानाचे रक्षण करेल का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


















Total views : 6917