हट्ट ठरला जीवघेणा! ‘पैसे आल्यावर घेऊ’ म्हणताच तरुणाने संपवली जीवनयात्रा .
➡️ मोहोळमध्ये धक्कादायक घटना; मोबाईलच्या व्यसनाचा वाढता धोका पुन्हा अधोरेखित
दैनिक त्रिशक्ती / राजेश शिंदे
मोहोळ : मोबाईलच्या वाढत्या व्यसनामुळे समाजात किती गंभीर परिणाम होत आहेत, याचे आणखी एक धक्कादायक उदाहरण मोहोळमध्ये समोर आले आहे. मोबाईल घेऊन देण्यास उशीर होत असल्याने नाराज झालेल्या तरुणाने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणाचा मोबाईल काही दिवसांपूर्वी फुटला होता. त्यानंतर तो वारंवार आई-वडिलांकडे नवीन मोबाईल घेण्याची मागणी करत होता. मात्र “थोडे दिवस थांब, पैसे आल्यावर घेऊ” असे पालकांनी समजावून सांगितले. यामुळे तो मानसिकदृष्ट्या नाराज झाला होता.
घटनेच्या दिवशी रात्री जेवण करून तो आपल्या खोलीत गेला. सकाळी उशिरापर्यंत बाहेर न आल्याने कुटुंबीयांनी पाहणी केली असता त्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
सदर तरुण उच्च शिक्षण घेत होता आणि कुटुंबासोबत मोहोळ शहरातील जिजाऊ अपार्टमेंटमध्ये राहत होता. पोलिसांनी या प्रकरणाची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.
मोबाईल व्यसनाचा वाढता धोका
अलीकडच्या काळात मोबाईल हा केवळ साधन न राहता तरुणांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनत चालला आहे. मोबाईल न मिळाल्यास किंवा वापरावर निर्बंध आल्यास अनेक तरुण मानसिक तणावात जात असल्याचे चित्र दिसून येत आहे.
यापूर्वीही मोहोळ तालुक्यात अशाच प्रकारची घटना घडली होती, ज्यात मोबाईल वापरास नकार दिल्याने अल्पवयीन मुलाने आत्महत्या केल्याची नोंद आहे.
ही घटना केवळ एका कुटुंबाची शोकांतिका नसून समाजासाठी इशारा आहे. वेळेत संवाद, समज आणि योग्य मार्गदर्शन न मिळाल्यास अशा घटना पुन्हा घडू शकतात, हे या प्रकरणातून स्पष्ट झाले आहे.
कोट : – प्रश्न उपस्थित करणारी घटना
मोबाईलचे वाढते व्यसन किती घातक ठरत आहे?
पालकांनी मुलांशी संवाद कसा वाढवावा?
मानसिक तणाव ओळखण्यात आपण कमी पडतोय का?




















Total views : 7847