अनगरचे मंडल अधिकारी नागटिळकांवर कारवाई की तडजोडीचा खेळ? तहसीलदारांच्या ACB तीन तास चौकशीचे गूढ कायम!
➡️ तीन तासांच्या ACB चौकशीनंतरही मौन; महसूल विभागाची भूमिका धूसर, सत्य बाहेर येणार की प्रकरण दडपणार?
दैनिक त्रिशक्ती / राजेश शिंदे
मोहोळ : – अनगर सर्कलमधील ८९ इजार रुपये घेऊन तीन ट्रॅक्टर कारवाई न करताच भरारी पथकातील प्रमुख अनगर मंडल अधिकारी बालाजी नागटिळक प्रकरण गाजत असलेल्या प्रकरणामुळे महसूल विभाग पुन्हा एकदा संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मंडल अधिकारी बालाजी नागटिळक यांच्यावर गंभीर आरोप असताना अद्याप ठोस कारवाई होत नसल्याने “कारवाई होणार की प्रकरण तडजोडीतून मिटवले जाणार?” असा संतप्त सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.
दरम्यान, दिनांक १ एप्रिल रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) कार्यालयात तहसीलदार सचिन मुळीक यांची तब्बल तीन तास कसून चौकशी ( झाडाझडती ) झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या चौकशीत नेमके काय उघड झाले, कोणत्या बाबींवर प्रश्न झाले आणि जबाबातून काय निष्पन्न झाले याबाबत अद्याप अधिकृतरीत्या काहीही स्पष्ट करण्यात आलेले नाही. त्यामुळे संपूर्ण प्रकरण “गुलदस्त्यात” ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, अशी शंका अधिकच बळावत आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, अनगर सर्कलमधील व्यवहार, महसूल नोंदी आणि संबंधित निर्णयप्रक्रियेत अनेक विसंगती आढळून आल्या असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे नागटिळक यांच्यावर गुन्हा दाखल होणार का, की वरच्या पातळीवरून दबाव टाकून प्रकरण दाबले जाणार—याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महसूल विभागाकडून यापूर्वीही अनेक प्रकरणांमध्ये कारवाईची फक्त घोषणा करून प्रत्यक्षात मात्र विलंब लावल्याचे चित्र दिसून आले आहे. त्यामुळे या प्रकरणातही “ढकलाढकली” करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न सुरू असल्याची चर्चा रंगली आहे.
दरम्यान, ACB ची चौकशी इतक्या गंभीर पातळीवर पोहोचूनही त्यातील निष्कर्ष सार्वजनिक न होणे, ही बाब संशयास्पद मानली जात आहे. जर सर्व काही पारदर्शक असेल, तर चौकशी अहवाल जाहीर करण्यास अडचण काय? असा थेट सवाल आता जनतेतून विचारला जात आहे.
प्रशासनाची भूमिका संशयास्पद?
या संपूर्ण प्रकरणात महसूल विभागाची भूमिका सुरुवातीपासूनच संदिग्ध राहिली आहे. तक्रारी असूनही तात्काळ कारवाई न होणे, संबंधित अधिकाऱ्यांना संरक्षण दिले जात असल्याची चर्चा आणि चौकशी अहवाल लपवण्याची शक्यता—या सर्व गोष्टींमुळे प्रशासनावरील विश्वास डळमळीत होत आहे.
त्यामुळे जनतेतून मागणी होत आहे की,नागटिळक यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा तसेच मोहोळ तहसीलदार सचिन मुळीक यांच्या चौकशीचा अहवाल सार्वजनिक करावा आणि
संबंधित सर्व अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी .
अनगर मंडल अधिकारी बालाजी नागटिळक प्रकरण आता केवळ एका अधिकाऱ्यापुरते मर्यादित न राहता संपूर्ण महसूल व्यवस्थेतील पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उभे करत आहे. येत्या काही दिवसांत प्रशासन ठोस पावले उचलते की पुन्हा एकदा प्रकरण दडपले जाते—याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.



















Total views : 7806