

जनतेच्या दारात सत्ता!” पाडोळीतील जनता दरबारात प्रश्नांवर झटपट फैसला
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीचा धडाकेबाज उपक्रम
राजुरी | प्रतिनिधी
धाराशिव पंचायत समिती अंतर्गत पाडोळी (आ) येथे आयोजित करण्यात आलेला जनता दरबार नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यावर तातडीने तोडगा काढणारा प्रभावी उपक्रम ठरला. आमदार राणाजगजितसिंह (दादा) पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या दरबारामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
या जनता दरबाराचे अध्यक्षस्थान पंचायत समितीचे उपसभापती प्रमोद पाटील यांनी भूषविले. यावेळी पंचायत समिती सदस्य प्रशांत तात्या रणदिवे, जिल्हा परिषद सदस्य दयानंद शिंदे यांच्यासह विविध गावांतील सरपंच, उपसरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दरबारामध्ये घरकुल योजना, शेतरस्ते, सिंचन विहिरी तसेच मनरेगा (MREGS) अंतर्गत विविध योजनांशी संबंधित समस्या नागरिकांनी मांडल्या. सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित असल्यामुळे अनेक तातडीच्या प्रश्नांचे जागेवरच निवारण करण्यात आले, तर उर्वरित समस्यांवर लवकरात लवकर कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले.
या उपक्रमामुळे प्रशासन आणि जनतेमधील दरी कमी होत असून नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पंचायत समितीची तत्परता पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
या कार्यक्रमासाठी पाडोळी, कनगरा, धुत्ता, टाकळी (बें) आदी गावांतील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, ग्रामसेवक तसेच ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित पवार यांनी केले.


















Total views : 9327