“मत मागण्यासाठी बेंबळी मतदारसंघात येणं समजू शकतं, पण उद्या एखादं काम अडलं तर त्यासाठी कुठे जायचं?” असा थेट सवाल नागरीकामधून .
बेंबळी | प्रतिनिधी
बेंबळी जिल्हा परिषद गटात निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रचारासोबतच उमेदवाराच्या वास्तव्यासंदर्भातील मुद्दा सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. उबाठा गटाचे उमेदवार गेली वीस वर्षांहून अधिक काळ रायगड जिल्ह्यात वास्तव्यास असून, निवडणुकीच्या काळात मात्र बेंबळी मतदारसंघात सक्रिय झाल्याने मतदारांमध्ये संभ्रम आणि प्रश्न उपस्थित होत आहेत.
“मत मागण्यासाठी बेंबळी मतदारसंघात येणं समजू शकतं, पण उद्या एखादं काम अडलं तर त्यासाठी कुठे जायचं?” असा थेट सवाल अनेक नागरिक करत आहेत. जिल्हा परिषद सदस्य हा केवळ निवडणुकीपुरता मर्यादित न राहता, दैनंदिन अडचणींमध्ये सहज उपलब्ध असणारा असावा, अशी अपेक्षा मतदार व्यक्त करत आहेत.
बेंबळी गटात पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, आरोग्य सेवा आणि शिक्षणाशी संबंधित अनेक प्रश्न अद्याप प्रलंबित आहेत. या प्रश्नांवर सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी गावाशी घट्ट नातं असलेला आणि कायम संपर्कात असणारा लोकप्रतिनिधी आवश्यक असल्याची भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की, “अर्ज द्यायचा झाला, तक्रार मांडायची असेल किंवा तातडीची अडचण निर्माण झाली, तर त्यासाठी रायगडला जावे लागेल का?” या प्रश्नामुळे मतदार अधिक सजगपणे विचार करून निर्णय घेण्याच्या भूमिकेत दिसत आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार महेंद्र काका धुरगुडे यांच्याबाबत मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण होत असल्याचे चित्र आहे. परिसरात सातत्याने उपस्थिती, नागरिकांच्या अडचणी थेट ऐकून घेण्याची पद्धत आणि प्रश्नांवर त्वरित लक्ष देण्याची तयारी यामुळे अनेक मतदारांचा कल त्यांच्या दिशेने वाढताना दिसत आहे.
“निवडणूक संपल्यानंतरही प्रतिनिधी उपलब्ध असावा,” अशी स्पष्ट अपेक्षा मतदार व्यक्त करत आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत केवळ पक्ष न पाहता उमेदवाराची उपलब्धता, बांधिलकी आणि काम करण्याची तत्परता या मुद्द्यांवरच मतदारांचा कौल लागण्याची शक्यता आहे.
दरम्यान, बेंबळी मतदारसंघातील मतदार अधिक जागरूक होत असून, कोण गावाशी खऱ्या अर्थाने जोडलेला आहे आणि कोण प्रत्यक्ष कामासाठी वेळ देऊ शकतो, याचा विचार करूनच मतदान होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.




















Total views : 5087