खामसवाडी गटाच्या विकासासाठी महायुतीला बळ द्या – मल्हार पाटील यांचे आवाहन
खामसवाडी | प्रतिनिधी
कुटुंबातील मार्गदर्शक आणि राज्याचे लाडके नेते स्व. अजितदादा पवार यांच्या निधनाचे दुःख अद्यापही मनावर असतानाही, जनतेप्रती असलेली जबाबदारी लक्षात घेऊन युवा नेतृत्व मल्हार पाटील यांनी निवडणूक प्रचारात सक्रिय सहभाग घेतला आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत कुटुंबातीलच कार्यकर्ते मैदानात असल्याने, त्यांना ताकद देण्यासाठी मल्हार पाटील यांनी खामसवाडी येथे प्रचारसभेला संबोधित केले.
खामसवाडी जिल्हा परिषद गटासाठी भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस महायुतीचे उमेदवार श्री. विश्वास कोकणे तसेच पंचायत समितीसाठी महायुतीचे उमेदवार श्री. किरण पाटील यांच्या प्रचारासाठी ही सभा पार पडली. यावेळी बोलताना मल्हार पाटील यांनी, देशात व राज्यात महायुतीचे सरकार असताना, त्याचा थेट फायदा स्थानिक विकासासाठी करून घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.
“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून खामसवाडी गटातील विकासकामांसाठी अधिकाधिक निधी मिळवायचा असेल, तर जिल्हा परिषद व पंचायत समितीत महायुतीचेच प्रतिनिधी असणे आवश्यक आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. समाजातील तळागाळातील घटकांच्या समस्या समजून घेऊन काम करणारे उमेदवार म्हणून विश्वास कोकणे यांचा उल्लेख करत, त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या सभेत खामसवाडी गटातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. युवा नेतृत्व मल्हार पाटील यांच्या उपस्थितीमुळे आणि स्पष्ट भूमिकेमुळे प्रचाराला नवे बळ मिळाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले.























Total views : 5087