तुळजापूरमध्ये भरदिवसा चाकू-रॉडने हाणामारी व गोळीबार; गुंडगिरीविरोधात शिवसेना-काँग्रेस आघाडीचा जाहीर निषेध
पोलीस अधीक्षकांना निवेदन; आरोपींवर कठोर कारवाईची मागणी
धाराशिव | प्रतिनिधी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचे पवित्र तीर्थक्षेत्र असलेल्या तुळजापूर शहरात दि. १६ डिसेंबर २०२५ रोजी भरदिवसा घडलेल्या गंभीर गुन्हेगारी घटनेमुळे खळबळ उडाली आहे. काही गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी चाकू व लोखंडी रॉडच्या सहाय्याने गंभीर मारहाण करत गोळीबार केल्याची घटना घडली असून, यामुळे शहरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या आघाडीच्या वतीने या घटनेचा तीव्र शब्दांत जाहीर निषेध करण्यात आला आहे. संबंधित गुंडांवर तात्काळ कठोर व कायदेशीर कारवाई करावी, अशी ठाम मागणी पोलीस अधीक्षक, धाराशिव यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, संबंधित गुंडांकडून ड्रग्स, अवैध दारू तसेच इतर बेकायदेशीर धंदे खुलेआम सुरू असून, तुळजापूरसारख्या श्रद्धास्थळी गुन्हेगारी वाढत आहे. या प्रकारामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, आई तुळजाभवानीच्या पवित्र नगरीची बदनामी होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
शहरातील कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी आरोपींना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
हे निवेदन प्रशांत नानासाहेब पाटील, अग्निवेश शिंदे, सोमनाथ गुरव यांचेसह शिवसेना उबाठा व काँग्रेस पक्षाच्या शहर पदाधिकाऱ्यांच्या वतीने सादर करण्यात आले. यावेळी विविध सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.





















Total views : 4449